रत्नागिरी : राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे खास शेतकऱ्यांसाठी ‘कृषिक’ नवे मोबाइल अॅप विकसित करण्यात आले आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना घरबसल्या खतसाठ्याची अचूक माहिती मिळणार आहे. याशिवाय खताचा प्रकार, दर, उपलब्धता याबाबत माहिती मिळेलच तसेच कुठल्या पिकाला कोणते खत द्यावे याबाबतही मार्गदर्शक माहिती मिळणार आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १४ हजार मेट्रिक टन खताचा वापर केला जातो. सर्वाधिक युरिया खताचा वापर असून, खालोखाल मिश्र खतांना मागणी आहे. जिल्ह्यात ८० ते ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात विविध पिकांची लागवड केली आहे. कृषिक अॅपमध्ये खत विक्रेत्यांची यादी, त्यांचे मोबाइल क्रमांक आणि त्यांच्या दुकानातील साठ्याची माहिती नियमित अपडेट केली जाणार आहे. त्यामुळे दुकानात खत असूनही नाकारले गेले तर संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जाऊ शकते.
पिकांसाठी खतांची मात्रा देताना शेतकरी गोंधळतात; परंतु कृषिक अॅपमुळे कोणत्या पिकासाठी कोणत्या खताची मात्रा योग्य आहे, हे सुद्धा कळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कृषिक अॅप फायदेशीर व महत्त्वपूर्ण आहे.
कृत्रिम खतटंचाई, शेतकऱ्यांची लूट थांबणार
खताची कृत्रिम टंचाई दाखवून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा कृषिक अॅपद्वारे करता येऊ शकतो. कृषी विभाग अशा विक्रेत्यांवर कारवाई करू शकतो.
‘कृषिक’ अॅप प्लेस्टोअरवर उपलब्ध
मोबाइलवरील प्लेस्टोअरमध्ये ‘कृषिक’ टाइप करून अॅप डाऊनलोड करता येण्याची सुविधा आहे.
विक्रेत्यांकडील खताचा साठा कळणार
कृषिक अॅपमध्ये खत विक्रेत्यांची यादी, त्याचे मोबाइल क्रमांक आणि त्यांच्या दुकानातील साठ्याची माहिती नियमितपणे अपडेट केल्यामुळे खताचा साठा कळण्यास मदत होणार आहे.
बाजारभाव व कृषिविषयक योजनांची माहिती
अॅपमध्ये बाजारभाव, कृषी योजना, प्रशिक्षणाची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या आवश्यक माहिती उपलब्ध होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:56 PM 24/May/2025














