रत्नागिरी : तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या येथील मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलची संतोष गार्डी यांच्या लेखणीतून उतरलेली ‘जीवन वाचवा’ या विज्ञान नाटिकेने राज्यस्तरावर दुसरा क्रमांक पटकावला. प्रशालेचे विज्ञान नाट्यस्पर्धेतील हे पहिलेच यश आहे.
राज्य विज्ञान व गणित शिक्षणसंस्था नागपूर यांच्यातर्फे ‘राज्यस्तरीय विज्ञान नाट्यस्पर्धा २०२४’ या स्पर्धा भंडारा येथे झाल्या. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील आठ शैक्षणिक विभागातून प्रथम आलेल्या नाटिका सादर झाल्या. जागतिक जलसंकट, एआय आणि समाज, आरोग्य आणि स्वच्छता, हवामान बदल आणि त्याचे परिणाम या विषयावर भाष्य करणाऱ्या विज्ञान नाट्य सादर झाल्या. स्पर्धेत देसाई हायस्कूलच्या जीवन वाचवा या विज्ञान नाटिकेला राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
या नाटिकेतील कलाकार महेक सलीम मुल्ला हिला राज्यस्तरीय उत्कृष्ट स्त्री अभिनयाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. जीवन वाचवा या नाटिकेचे लेखन व दिग्दर्शन शिक्षक संतोष गार्डी यांनी केले होते. पाण्याची बचत केली नाही किंवा पाण्याचे प्रदूषण थांबले नाही तर त्याचे भविष्यात कोणते परिणाम होऊ शकतात, यावर हे नाटक आधारित होते. जीवन वाचवा या नाटकातील सहभागी विद्यार्थ्यांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जीवन वाचवा या नाटिकेमध्ये तनया लिंगायत, भावेश खरात, चांदबी शेख, रिया खेत्री, आरोही शिंदे, महेक मुल्ला, पूर्वा कांबळे, लावण्या साळुंखे यांनी उत्कृष्ट भूमिका केल्या. नाटिका यशस्वी होण्यासाठी शिक्षिका अंजली पिलणकर यांचे विशेष सहकार्य लाभले. मुख्याध्यापिका प्रज्ञा दळी यांनी सर्वच बालकलाकारांचे कौतुक केले.
राज्यस्तरीय विज्ञान नाट्यस्पर्धेत प्रशालेतर्फे दोनवेळा प्रयत्न केला होता; पण यशाला गवसणी घालता आली नव्हती; मात्र या वेळी लेखन-दिग्दर्शनावर खूप मेहनत घेतली. प्रशालेचे सहकारी व संस्था यांनी पाठिंबा दिला. मुलांच्या सराव आणि मेहनतीमुळे द्वितीय क्रमांकापर्यंत पोहोचलो. – संतोष गार्डी, शिक्षक, देसाई हायस्कूल
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:50 11-10-2024