खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील शिरवली नजीक गुरुवारी दुपारच्या सुमारास निसरड्या रस्त्यामुळे खेड-तुळशी-बोरिवली एसटी बस रस्त्यालगत घसरली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून, कुठल्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
चालक एस. बी. कागदे हे खेड-तुळशी-बोरिवली एसटीमधून २२ प्रवाशांना घेऊन खेड स्थानकातून बोरिवलीकडे जात असताना, निसरड्या झालेल्या रस्त्यावरुन बस अचानक घसरली. चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने बस थांबवली. अचानक घडलेल्या या प्रकाराने बसमधील प्रवासी भयभीत झाले होते. अपघातानंतर सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शिरवली नजीकचा रस्ता निसरडा झाल्याने गेल्या ३-४ दिवसांपासून येथे सातत्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी या मार्गावर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:34 PM 24/May/2025














