रत्नागिरी : १ मे महाराष्ट्र दिनाच्या रोजी रत्नदुर्ग किल्ल्यात काही वीर पुरुषांच्या स्मृतीशिळा व सतीच्यास्मृती शिळा सापडल्या त्यात दोन वीर पुरुषांच्या स्मृती स्मारक मिळाल्या. त्यातील एक महत्त्वाची वैशिष्टे पूर्ण लक्षवेधनारी वीरषुरुष स्मृतीस्मारक आहे. या स्मृतीस्मारकावर महिरपी कमानी आहे व कमानीच्या दोन्ही बाजूला पुष्प कोरलेली आहेत.

स्मृती स्मारकाच्या आतमध्ये दिवाबत्ती करण्यासाठी छोटी खण कोकणी भाषेत साने यांची सोय केलेली आहे. ही शिळा साधारण तीन फूट उंच आहे व त्यामध्ये लिंग स्थापित केलेले आहे. तसेच या शिळेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यावर शरभ नावाच्या प्राण्याचे अंकन स्मारकाच्या मागच्या व डाव्या बाजूला कोरलेले आहे.
स्मारकाचा ऐतिहासिक संदर्भ
या वीरपुरुष स्मृतीस्मारकाच्या इतिहासाचा शोध घेताना काही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सन १५२६ च्या सुमारास बहामनी राज्याचे पाच भाग झाल्यानंतर, विजापूरच्या सुलतान युसुफ आदिलशहाने लहान सहान बंडे मोडण्यासाठी अनेक मराठा व मुसलमान सरदारांची नेमणूक केली होती. यातच गुणवंतगड आणि दंतगिरी परगण्याची देशमुखी मिळालेले चालुक्य राजकुलोत्पन्न सोरबाजी साळुंखे यांचे वंशज तुकोजीराव व रामराव या बंधूंना सध्याच्या सातारा आणि कोकणपट्टीतील भागाच्या बंदोबस्तासाठी मोकासेदार म्हणून नेमण्यात आले होते.
विजापूरच्या कल्याण सुभ्याहून तुकोजीराव आपले पुत्र प्रतापराव, हंबीरराव, जगपाळराव, महाकाळ आणि बंधू रामराव यांच्या समवेत ५००० फौजेसह स्वारीवर निघाले. प्रथम त्यांनी सातारा प्रांतात येऊन पाटण परगणा जिंकला. या युद्धात त्यांचा तिसरा पुत्र जगपाळराव शौर्याने लढून थकून पडल्याने त्यांना जिंकलेल्या भागाचे व्यवस्थापन पाहण्यासाठी तेथेच ठेवण्यात आले. तुकोजीराव उर्वरित तीन पुत्र व बंधू रामराव यांच्यासह कोकण प्रांताच्या बंदोबस्ताकरिता पुढे निघाले. संगमेश्वर तालुक्यातील धामधूम मोडून, त्या भागाच्या बंदोबस्तासाठी तुकोजीरावांनी आपला ज्येष्ठ पुत्र प्रतापराव यांस महिपतगडावर ठेवले आणि आपला मोर्चा रत्नागिरीकडे वळवला.
रत्नागिरी किल्ल्यावरील ऐतिहासिक लढाई
त्यावेळी रत्नागिरी किल्ल्यात अनंतसिंह नावाचा रजपूत किल्लेदार होता. बहामनी राज्याच्या अव्यवस्थेचा फायदा घेऊन तो जलमार्गाने लुटालूट करणाऱ्या चाचे लोकांना सामील होऊन लहानसहान बंडे आणि लुटालूट करत होता. यामुळे तुकोजीरावांनी आपला मोर्चा प्रथम रत्नागिरी किल्ल्याकडे वळवून अचानक छापा घातला. या लढाईत तुकोजीराव यांचे बंधू रामराव यांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. अंबारीत बसलेल्या अनंतसिंहावर त्यांनी सिंहाप्रमाणे झडप घातली. मात्र, अंबारीतील अनंतसिंहाच्या बाणाने अचूक वेध घेतल्याने रामराव धारातीर्थी पडले. आपल्या चुलते पडल्याचे कळताच तरुण रक्ताचे हंबीरराव त्वेषाने पेटून उठले आणि त्यांनी अनंतसिंहाबरोबर निकराची लढाई केली, पण त्यांनाही वीरगती प्राप्त झाली.
अशाही परिस्थितीत तुकोजीरावांनी शांत चित्ताने युद्धनीती आखून अनंतसिंहाला चारही बाजूंनी घेरले आणि जेरबंद करून विजापूरच्या बादशहाकडे रवाना केले. या लढाईत तुकोजीराव सावंत-साळुंखे यांनी अनंतसिंहाचा पूर्ण पराभव केल्याने बादशहा खुश झाला आणि त्याने जिंकलेला भाग तुकोजीरावांच्या तैनातीला नेमून दिला. त्यानंतर तुकोजीरावांनी आपले लष्करी ठाणे झाडगाव येथे बांधून तेथून आपल्या वतनाचा कारभार सुरू केला. सध्या या भागाला ‘चौकी’ असे म्हणतात. तुकोजीरावांनी नंतर हा गाव वसविला आणि झाडगाव येथे आपली कुलस्वामिनी जोगेश्वरीची स्थापना केली. तिच्या देवालयासमोर त्यांनी रणांगणी पतन पावलेल्या आपल्या बंधू रामराव यांच्या स्मरणार्थ त्यांची प्रतिमा कोरलेली (हत्तीवर चढाई करून जाणारे रामराव) लहानशी शिळा बसवली. याचे संदर्भ ‘सावंत साळुंखे घराण्याची कैफियत व वंशावळ’ या पुस्तकात उपलब्ध आहेत.
स्मृतीस्मारकांचे जतन आणि पुढील संशोधन
या स्मारकाजवळ अजून एक स्मृतीशिळा आहे, जी नवीन रस्त्यालगत तटबंदी झाल्यामुळे पडझडीच्या स्थितीत आहे. त्यामुळे आतील अवशेष नष्ट झाले आहेत. मात्र, दोन्ही स्मृतीशिळांवरील शरभ प्राण्याचे अंकन आजही जसेच्या तसेच कोरलेले पाहायला मिळते. सदर दोन्ही स्मृतीशिळा वैयक्तिक मालकीच्या जागेत आहेत. अशा दुर्मिळ आणि ऐतिहासिक ठेवा असलेल्या वास्तूंचे जतन व संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून आपल्या पुढील पिढीला या वीर पुरुषांच्या बलिदानाचा आणि पराक्रमाचा इतिहास माहिती होईल, असे वीरगळ व सतीशिळा अभ्यासक स्नेहल बने यांचे म्हणणे आहे. या स्मृतीशिळेबाबत अधिक संशोधन होण्याची गरज असून, पुढील शोधकार्याचे प्रयत्न सुरू राहणार असल्याचेही स्नेहल बने यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:15 PM 24/May/2025














