गुहागर : तालुक्यात भूमिगत विद्युतवाहिनीचे काम करत असताना रस्त्याच्या कडेने खोदकाम करण्यात आले. त्यामुळे रस्त्याच्या कडेलगतच्या साईडपट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
ठेकेदाराकडून रस्त्याच्या झालेल्या नुकसानीकडे दुर्लक्ष झाल्याने पावसामुळे हे रस्ते अधिक धोकादायक झाले आहेत. शहरातील खालचापाट येथील रस्त्याशेजारील संरक्षक भिंत कोसळली आहे. तसेच तालुक्यातील अनेक मार्गावर खोदकाम करण्यात आलेला भराव वाहून रस्त्यावर पसरला असून, रस्ता चिखलमय बनला आहे. तालुक्यातील समुद्रालगत असलेल्या गावांमध्ये भूमिगत विद्युतवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. या कामातून अनेक वाद निर्माण झाले.
रस्त्याच्या कडेने खोदकाम सुरू असल्याने रस्त्याच्या कडेलगतच्या साईडपट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गटारात टाकलेल्या भूमिगत विद्युतवाहिन्यांमुळे भविष्यात दुर्घटना घडू शकते. शहरातील खालचापाट येथे वहाळाच्या बाजूला खूप जुनी संरक्षक बांध बांधला गेला आहे. पावसाळ्यात या वहाळामध्ये तुडूंब पाणी वाहत असत.
जेव्हा भूमिगत वाहिनी टाकण्यासाठी आले तेव्हा या संरक्षक भिंतीच्या बाजूने खोदकाम करू नका, असे सांगण्यात आले. संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. खोदकाम केल्याने संपूर्ण बांधीचे दगड सरकून बांधी धोकादायक बनली. गेले पाच दिवस पडणाऱ्या पावसामुळे बांधी कोसळली असून, वाहनचालकांना वाहने घेऊन जाणे धोक्याचे झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 26/May/2025














