रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील उक्षी फाटा येथे चिखलात वाहने रुतण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत अशी तिसरी घटना घडली असून रत्नागिरीहून मुंबईकडे जाणारी एक ट्रॅव्हल्स चिखलात रुतल्याने प्रवाशांना मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत मदतीची वाट पाहावी लागली. महामार्ग ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे उक्षीतील नागरिक आणि पर्यटक त्रस्त झाले आहेत.
ही घटना शुक्रवारी (ता. २३) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. यापूर्वी दोन दिवसांत चारचाकी गाड्या चिखलात रुतल्या होत्या आणि त्यांच्या मालकांना स्वखर्चाने गाड्या बाहेर काढाव्या लागल्या होत्या. शुक्रवारच्या घटनेत ट्रॅव्हल्स एका बाजूला कलंडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. ट्रॅव्हल्स रात्रीच बाहेर काढणे शक्य नसल्याने प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करावी लागली. या सततच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मुंबई-गोवा महामार्ग ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गाचे काम सुरू असल्याने उक्षी-करबुडे हा रस्ता प्रवाशांना सोयीचा पडतो. शासकीय अधिकारी, मंत्री तसेच पर्यटकही या रस्त्यावरून प्रवास करतात. मात्र, ठेकेदार कंपनीने सर्व्हिस रोड ठेवला असला तरी तिथे कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक किंवा रस्त्याच्या कडेला संरक्षक खांब उभे केलेले नाहीत. मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रोड यांच्यामधील जागेत माती टाकलेली नसल्याने खोलगट खड्डा निर्माण झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 26/May/2025














