संगमेश्वर : आंबव पोंक्षे-आरवली रस्ता खचला

संगमेश्वर : तालुक्यातील तुरळ ते माखजन सरंद-आंबव पोंक्षेमार्गे आरवली असा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग ३ मधून रस्ता झाला. यामधील आंबव पोंक्षे ते आरवली रस्त्यावर रस्ता खचला आहे. याठिकाणी मैलाचा पुरलेला दगडही वाहून गेला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या रस्त्याचे पहिल्याच पावसात तीनतेरा वाजले आहेत.

या रस्त्याला खरोखर ज्या ठिकाणी संरक्षण भिंत हवी होती, त्या ठिकाणी बांधलीच गेली नाही. परंतु अनावश्यक ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी हा रस्ता खचला आहे, तिथे संरक्षण भिंत होणे गरजेचे होते. आंबव पोंक्षेचे सरपंच शेखर उकार्डे यांनी सातत्याने मागणी केली होती. परंतु संरक्षण भिंत घातली गेली नसल्याचे सरपंच शेखर उकार्डे यांनी सांगितले.

आंबव पोंक्षे गावामध्ये रस्ता होऊन महिना होण्याआधीच या रस्त्याची दुर्दशा होत आहे. रस्त्याच्या कामावेळी अनेक ठिकाणी भातशेतीमधून चुकीची गटारे बांधण्यात आली. आवश्यक ठिकाणी गटारात पाईप टाकण्यात आलेले नाहीत. या साऱ्याच गोष्टींची केंद्र शासनाच्या पथकाकडून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता मजूर होण्यापूर्वी रस्त्यालगत असलेल्या जागा मालकांची कोणतीही ना हरकत घेण्यात आली नव्हती.

रस्ता मंजूर झाल्यावर शेतकऱ्यांना आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीने मध्यस्थी करून रस्ता रुंदीकरणास अनुकूल करण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी पूर्ण करून देण्याची जबाबदारी ठेकेदाराने घेतली होती. पण सध्या अनेक कामे तशीच राहिल्याने या गोष्टीकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे. सुमारे सात कोटी रुपये खर्च करून झालेल्या या रस्त्याची तातडीने उच्चस्तरीय पाहणी आणि चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 26/May/2025