रत्नागिरी : पद्मश्री तलयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तबला, पखवाज, संवादिनी कार्यशाळा

रत्नागिरी : येथील आर्ट सर्कल संस्थेतर्फे येत्या १४ आणि १५ जून रोजी तबला आणि पखवाज प्रशिक्षण आणि संवादिनी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

तलायोगी पंडित सुरेश तळवलकर या संपूर्ण कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक असतील, तर संवादिनीचे मार्गदर्शन सुप्रसिद्ध संवादिनीवादक आणि अत्यंत कल्पक कलाकार अनंत जोशी करणार आहेत.

संस्थेचे उपक्रम फक्त आयोजनापुरते मर्यादित न राहता रत्नागिरीतील गुणी कलाकारांना तपस्वी कलाकारांचे मोलाचे मार्गदर्शन मिळावे, या हेतूने या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.

नृत्य, गायन आणि वादन या तिन्ही प्रकारांमध्ये ताल हा आत्मा असतो. तालाचे विशुद्ध ज्ञान हा संगीत सादरीकरणाला वेगळीच उंची आणि दर्जा प्राप्त करून देत असतो. मैफिलीचा तोल सांभाळणारा हा ताल अंगात मुरावा लागतो, त्यासाठी अपार अविश्रांत रियाज, मेहनत करावी लागते. प्रत्येक कलाकार ही मेहनत घेत असतो. अशा मेहनतीला योग्य दिशा देण्याचे, विचार देण्याचे काम पंडित सुरेश तळवलकर यांच्यासारखे अध्वर्यु करत असतात.

संवादिनी हे संगीत मैफिलीतील अत्यंत महत्त्वाचे आणि उपजत सुरेल वाद्य. परंतु साथसंगत आणि एकल अशा दोन्ही प्रकारांमध्ये प्रावीण्य मिळवायचे असेल तर मात्र कलेबरोबरच कौशल्यही आत्मसात करावे लागते. त्यासाठी संवादिनीची ही कार्यशाळा नक्कीच उपयुक्त ठरेल. असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.

या दोन्ही कलाकारांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा फायदा रत्नागिरीतील सर्व कलाकारांना मिळावा म्हणून ही कार्यशाळा हे आर्ट सर्कलने आयोजित केली आहे.

कार्यशाळा शनिवार, 14 जून रोजी 3 वाजेपासून रविवार, दि. 14 जून रोजी संध्याकाळ 6 वाजेपर्यंत शिवाजीनगर येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात होईल. तबला-पखवाज कार्यशाळेचे शुल्क 1500, तर संवादिनी कार्यशाळेचे शुल्क 1000 रुपये आहे. शुल्कामध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना अल्पोपाहार, भोजन जेवण देण्यात येईल. बाहेरगावच्या शिबिरार्थींची राहण्याची सोय करायची असल्यास संस्थेशी 86690 82727 या क्रमांकावर संपर्क साधावा. संवादिनीसाठी चैतन्य पटवर्धन (8552899444 ) आणि हेरंब जोगळेकर (9422630660) यांच्याशी तबला आणि पखवाजसाठी संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 26-05-2025