चिपळूण : राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यालयावर धडक

चिपळूण : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शहराच्या हद्दीत विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक देत जाब विचारला. आठ दिवसांत महामार्गालगतची गटारे साफ करावीत तसेच पॉवरहाऊस व गुहागर बायपास येथे गतिरोधक टाकावेत अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा दिला.

शहरातून जाणाऱ्या महामार्गावर पाग पॉवरहाऊस आणि गुहागर बायपासजवळ सातत्याने अपघात होत आहेत. पॉवरहाऊस येथे तर अद्याप सिग्नल यंत्रणा बसवलेली नाही. परिणामी, येथे नियमितपणे अपघातांची मालिका सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेत अपघातग्रस्त ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विभागास याबाबतच्या सूचना दिल्या होत्या; मात्र अद्यापही त्यावर हालचाली झालेल्या नाहीत. महामार्गालगतची गटारे अनेक ठिकाणी फुटलेली आहेत तसेच ही गटारे दगडमातीने बुजून गेल्याने त्यातून पाण्याचा अपेक्षित निचरा होत नाही.

महामार्गावर रात्रीच्यावेळी पुरेसा वीजपुरवठादेखील केला जात नसल्याने पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागावर धडक देत त्याचा जाब विचारला. शाखा अभियंता श्याम खुणेकर यांच्याशी या पदाधिकाऱ्यांनी चर्चाही केली. त्यानुसार पाऊस कमी होताच गतिरोधक टाकण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले तसेच गटारे सफाईलाही त्वरित सुरुवात करणार असल्याचे सांगितले. या वेळी बापू काणे, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, उमेश सकपाळ, रामदास राणे, स्वानंद रानडे, विनोद बोभसकर, सुयोग चव्हाण, संजय तांबडे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 26/May/2025