चिपळूण : सीएनजी वाहनांची व्यवस्था शिवाजीनगर बसस्थानकावर

चिपळूण : शहरातील सीएनजी पंपावर थांबणाऱ्या वाहनांची व्यवस्था शिवाजीनगर बसस्थानकावर करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी संपुष्टात आली आहे.

सुट्टीच्या हंगामात कोकणात दाखल झालेले पर्यटक आपल्या वाहनांमध्ये सीएनजी भरण्यासाठी चिपळूण शहरात थांबतात. शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर दोन ठिकाणी सीएनजी पंप आहे. या ठिकाणी सीएनजी भरण्यासाठी पर्यटकांची एकाच वेळी १०० ते १५० वाहने लागतात. त्यात शहर आणि ग्रामीण भागातून येणारी रिक्षा रांगेत उभी राहिल्यानंतर शहरातील महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. मागील आठ दिवसापासून हा प्रश्न भेडसावत आहे. शहरांमध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. सीएनजी पंपाच्या शेजारी राज्य परिवहन महामंडळाचे बस स्थानक आहे.

मध्यवर्ती बस स्थानकातून सुटणारी वाहने या बसस्थानकावर येतात. तेथील प्रवासी उचलून नंतर पुढे जातात. सीएनजी भरण्यासाठी वाहने रस्त्यात उभी राहिल्यानंतर बसस्थानकातून येणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यासाठी मार्ग मिळत नाही.

बस स्थानकातून एखादी बस पुढे आली त्याच दरम्यान महामार्गावर दोन्ही बाजूने वाहने समोरासमोर आल्यानंतर सीएनजी भरण्यासाठी उभे असलेल्या वाहनांमुळे शिवाजीनगर बस स्थानक परिसरात वाहतूक कोंडी होते. या ठिकाणचे सेवा रस्ते अरुंद आहेत. रस्त्यावर वाहन लागल्यानंतर दुसरे वाहन पुढे जाण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागते.

या सर्व गोष्टींचा त्रास वाहन चालकांना आणि पर्यटकांना होतो. त्यावर पर्याय म्हणून सीएनजी भरण्यासाठी येणारी वाहने शिवाजीनगर बस स्थानकावर रांगेत उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाजीनगर बस स्थानकाच्या आवारात सिमेंट काँक्रिटीकरण केले आहे. त्यामुळे येथील जागा मोकळी आहे. या जागेवर एका बाजूला रिक्षा आणि दुसऱ्या बाजूला चारचाकी खासगी वाहने उभी केली जातात. तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सीएनजी पंप मालकाने आपले कर्मचारी तैनात केले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 26/May/2025