रत्नागिरी : जिल्हा विशेष कारागृह हे स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे. या ऐतिहासिक कारागृहाच्या इमारतीचे मजबुतीकरण आणि नुतनीकरण सुरू आहे. सुमारे पावणेसहा कोटी खर्च करून या कामांद्वारे कारागृहाला नवा साज मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील विविध कारागृहांमध्ये बांधकामांसाठी ५३.१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये रत्नागिरीच्या विशेष कारागृहाचाही समावेश होता. रत्नागिरी येथील विशेष कारागृहात आवश्यक बांधकामासाठीही या निधीचा विनियोग होणार आहे. सुमारे ५ कोटी ५२ लाख ७३ हजारांची निविदा काढली होती.
त्यानुसार रत्नागिरी विशेष कारागृह नुतनीकरण आणि मजबुतीकरणाला प्रारंभ झाला आहे. मुख्य इमारतीच्या दर्शनी भागाचे सुशोभीकरण सुरू आहे. त्यामध्ये स्ट्रक्चरल स्टील वर्क करणे, प्रिकोटेड शीट बसविणे, इमारतीच्या आवश्यक ठिकाणी जुने प्लास्टर काढून नवीन प्लास्टर केले जाणार आहे.
स्वयंपाकगृह गोदाम, मनोरंजन कलामंच, दवाखाना, वॉच टॉवर, जुने दरवाजे व खिडक्या काढून त्याठिकाणी नवीन बसविणे अशी कामे केली जाणार आहेत. या कारागृहाचे जुने छत काढून आता नव्याने प्रिकोटेड शीट बसविल्या जाणार आहेत. फोम सिलींग, आतील व बाहेरील रंगकाम, जलप्रतिबंधक उपाययोजना केल्या जाणार आहेत. कारागृह कार्यालयातील कारागृह अधीक्षक कार्यालयाचे नूतनीकरण, विविध शाखांचे नूतनीकरण केले जाणार आहे.
सावरकरांच्या कोठडीचेही नूतनीकरण
कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कोठडीचेही नूतनीकरण सुरू आहे. छायाचित्राच्या दालनाचे नूतनीकरण केले जाणार आहे. कोठडीची डागडुजी, सिलिंग केले जाणार आहे. सावरकरांची कोठडी पर्यटकांसाठी चोवीस तास खुली ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी या कोठडीमध्ये जाण्या-येण्याचाही स्वतंत्र मार्ग बनविण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 26/May/2025














