रत्नागिरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात आज कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅनचा (फिरते रुग्णालय) आणि फित कापून कर्करोग तपासणी मोहिमेचा प्रारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, प्रांताधिकारी जीवन देसाई, राहूल पंडित, बंड्या साळवी, बिपिन बंदरकर आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅनची पाहणी केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगताप यांनी व्हॅनबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली.
जिल्ह्यामध्ये मे व जूनमध्ये प्रत्येक तालुक्यात गावभेटीतून व्हॅनमध्ये मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करून, कर्करोगाचे निदान केले जाणार आहे. विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांपर्यंत महत्त्वपूर्ण तपासणी सेवा पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामुळे वेळेवर निदान करण्यात सुधारणा होईल आणि संभाव्यतः अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल. ही व्हॅन सामान्य कर्करोग्यांच्या तपासणीसाठी सुसज्ज आहे. त्यात सुरुवातीला डिजिटल मशीन वापरून स्तनाच्या तपासण्या आणि कॉल्पोस्कोप वापरून गर्भाशयाच्या मुखाच्या तपासण्या यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या संधीचा मोफत लाभ घेऊन नागरिकांनी मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोगाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर आदी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 26-05-2025














