गुहागरनाका- शासकीय विश्रामगृह रस्त्यासाठी आंदोलन

गुहागर : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गुहागरनाका ते शासकीय विश्रामगृह मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना मॉन्सूनपूर्व पाऊस संपताच दुरवस्था झालेल्या या रस्त्यावर कार्पेट मारून त्यांची गैरसोय दूर करावी, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यानी केल्या.

शहरातील नागरिकांना दुरवस्था झालेल्या रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाची दुरुस्ती व्हावी यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनसुद्धा दखल न घेतल्याने शहरातील संतप्त नागरिकांनी सकाळी जुने मच्छीमार्केट मार्गावर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर चिपळूण येथे जाऊन पालकमंत्री उदय सामंत व प्रांताधिकारी यांची भेट घेतली.

गुहागरनाका ते रेस्टहाऊस या महामार्गाच्या लांबीमध्ये पूर्णपणे खड्डे पडले असून, सदर खड्यांमध्ये नागरिकांना त्रास होत आहे. वाहनधारकांना जीव मुठीत घेउन प्रवास करावा लागत आहे सदर खड्ड्यामुळे किरकोळ स्वरूपाचे अपघात होत आहेत. सर्व राजकीय पक्षातील नागरिकांनी पत्रव्यवहार केला आहे; परंतु पत्रव्यवहारव्यतिरिक्त ठोस कारवाई होत नाही. म्हणून अमरदीप परचुरे, नीलेश मोरे, दीपक परचुरे, शार्दूल भावे, हेमंत बारटक्के, मंदार पालशेतकर, ज्योती परचुरे, मंदार आठवले, अक्षय खरे, नितीन वेडल, मनीष मोरे, विश्वास सोमण, मनीष खरे, अभिजित मर्दा, श्रीधर बागकर, उमेश भोसले, उदय आठवले, संतोष मावळणकर, प्रसाद बोले, केदार मालप, अमित मालप, उदय आठवले, पराग मालप, संजय मालप, ज्योती परचुरे आदीसह अन्य ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. ग्रामस्थांनी १५ मिनिटे राष्ट्रीय महामार्गवरील गुहागर-चिपळूण मार्ग रोखून धरला. काही काळ वाहतूक ठप्प झाली होतो.

सप्टेंबरपासून कामाला सुरुवात
या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थ चिपळूण येथे जाऊन पालकमंत्री उदय सामंत आणि प्रांताधिकारी यांची भेट घेऊन परिस्थिती निदर्शनास आणून दिली. तसेच प्रांताधिकारी यांनी १५ ऑगस्टपर्यंत भूसंपादन आणि मोबदल्याचा विषय मार्गी लावू आणि सप्टेंबरपासून कामाला सुरुवात करू, असे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 26/May/2025