Maharashtra Rains: राज्यात मुसळधार पाऊस; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रशासनाला निर्देश

मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले. याच पार्श्वभूमीवर मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

त्यामुळे प्रशासनाने सतर्कता ठेवून मदत कार्य करावे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी उद्या दिनांक २७ मे २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजेपर्यंत ‘रेड अलर्ट’ जारी केला. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यासह अनेक जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये, तसेच कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेवर आणि प्रभावी पावले उचलावी, असे निर्देश दिले.

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, “संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी, आवश्यकतेनुसार मदत आणि बचाव कार्य तत्परतेने पार पाडावे, पाण्याखाली गेलेले रस्ते, पुलांची स्थिती, विजेच्या तारा याकडे विशेष लक्ष द्यावे. धोकादायक इमारतीत संदर्भात देखील काळजी घ्यावी. मुंबई आणि ठाण्यासारख्या ठिकाणी उपनगरीय रेल्वे वाहतूक सुरळीत कशी राहील? यासाठी प्रयत्न करा आणि प्रवाशांची काळजी घ्या.”

नागरिकांना आवाहन करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “सखल भागांमध्ये राहणाऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगावी. आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये. प्रशासन तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे. मात्र, नागरिकांनी देखील सहकार्य करणे गरजेचे आहे.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:05 26-05-2025