राजापूर : गेले काही दिवस शहरासह ग्रामीण भागात जोरदारपणे मॉन्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे. त्यामध्ये नदीनाले वाहू लागले असून शहराला मुख्य जलस्त्रोत असलेल्या कोदवली येथील सायबाच्या धरणातील पाणीसाठा वाढला आहे. मॉन्सूनपूर्व पावसामुळे शहरातील पाणीटंचाई संपुष्टात आली आहे. नियमित पाणीपुरवठ्याला सुरुवात झाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.
एप्रिल-मे महिन्यातील वाढत्या तापमानामुळे सायबाच्या धरणातील पाणीसाठा कमी झाला होता. शीळ जॅकवेल येथून विद्युतपंपाने पाणीपुरवठा केला जात होता. १६ एप्रिलपासून शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता. त्यानंतर ८ मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता.
त्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. गेले आठ दिवस शहरासह ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सायबाच्या धरणातीही मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शहरामध्ये एक दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा आता नियमितपणे करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 26/May/2025














