अजित पवार सोडून गेल्यानं अस्वस्थता वाटली पण चिंता करायची नसते, शेवटी मजबुतीनं उभं राहायचं असतं : शरद पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयावर भाष्य केलं. अजित पवार यांनी साथ सोडल्यानं धक्का बसला नाही पण अस्वस्थता वाटली. अजित पवार एकटेच नाही तर त्यांच्यासोबत विधिमंडळातील 25-30 सभासद गेले. अनेकांच्या निवडणुकीच्या यशासाठी तिथं गेलो असेन, त्यांच्यासाठी भाषणं केली असतील. गेल्या पाच दहा वर्षात त्यांना ग्रुम केलं असेल, अजित पवार त्याच्यातील एक घटक  असं शरद पवार म्हणाले.  हे लोक सोडून जातात, विधिमंडळात ज्यांच्या विरुद्ध ते निवडून आले. ज्या भूमिकेला त्यांनी विरोध केला, तिच भूमिका घेऊन ज्यांच्याविरुद्ध लढले त्यांच्याच दारात बसले त्यामुळं अस्वस्थता वाटते. लोकांना जी कमिटमेंट केलेली आहेत, त्याच्याशी सुसंगत पावलं टाकली जात नाहीत, त्यामुळं अस्वस्थता असते, असं शरद पवार यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं.