दापोली : तालुक्यातील केळशी येथे नुकताच एक दुर्मिळ ‘सागरी विंचू’ आढळला आहे. जगभरात ‘लॉब्स्टर’ या नावाने पंचतारांकित रेस्टॉरंटमध्ये एक लोकप्रिय आणि महागडी डिश म्हणून ओळखला जाणारा हा सागरी जीव कोकणपट्ट्यात केवळ १ टक्क्यापेक्षाही कमी प्रमाणात आढळतो. क्वचित निदर्शनास येणाऱ्या या सागरी विंचूबाबत अनेकांना कुतूहल निर्माण झाले आहे.
मराठीत ‘साखळी शेवंड’ किंवा ‘साखळी कोळंबी’ असेही या सागरी व्हींचुला संबोधले जाते. हे सागरी प्राणी चिखलात आणि गाळात राहतात. त्यांच्या शरीरावर मजबूत कवच, मजबूत पाय आणि शेपटी असते. दिवसा ते बिळात लपून राहतात आणि रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. लहान मासे, मृदुकाय प्राणी, पाणवनस्पती आणि समुद्रतळाशी कुजलेले मांस हे त्यांचे अन्न आहे. रात्रीच्या वेळी ते बाहेर पडत असल्याने त्यांना सूर्यास्तानंतरच पकडता येते.
जगभरात मागणी, कोकणात दुर्लक्षित
साखळी शेवंड हा एक अपृष्ठवंशीय संधिपाद जलचर असून, तो कोळंबीसारखा दिसतो, पण आकाराने बराच मोठा असतो. अमेरिकेतील मेन प्रांतातील उपहारगृहांत तर यापासून ‘लॉब्स्टर आईस्क्रीम’ देखील तयार केले जाते. शेवंडात मोठ्या प्रमाणात प्रथिने असल्याने युरोप आणि अमेरिकेत ‘रेड लॉब्स्टर’ नावाने रेस्टॉरंटची साखळी मोठ्या प्रमाणावर चालवली जाते.
याउलट, कोकणातील अरबी समुद्रात या सागरी जीवाकडे फारसे लक्ष केंद्रित केले जात नसल्याचे चित्र आहे. येथे त्याला ‘सागरी विंचू’ म्हणून दुर्लक्षित केले जाते. कोळंबीची शेती मोठ्या प्रमाणात केली जात असली, तरी हा महागडा सागरी विंचू दुर्लक्षितच राहिला आहे. कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर १ टक्क्यापेक्षाही कमी प्रमाणात आढळत असल्याने आणि तो सूर्यास्तानंतरच चिखलात बाहेर पडत असल्याने त्याला शोधणे कठीण होते. त्यामुळे याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.
शेवंड प्रकारात मोडणारे इतर जीव
झिंगे, खेकडा आणि कोळंबी हे देखील शेवंड प्रकारातच मोडतात. कोकणात झिंगे, खेकडा आणि कोळंबी यांना खाद्य म्हणून मोठी मागणी आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 26/May/2025










