आता गुन्हेगारांची खैर नाही; डायरेक्ट मकोका लावणार : नितीन बगाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज आपला कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रातील दबंग पोलीस अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या बगाटे यांनी कोकणाला आपले दुसरे घर समजत असल्याचे सांगत, जिल्ह्यातील गुन्हेगारीवर कठोर कारवाईचा इशारा दिला.

बगाटे म्हणाले, “कोकणात पोस्टिंग मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. अंमली पदार्थांचे रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त करणे आणि वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करणे माझे प्राधान्य असेल.” त्यांनी पुढे सांगितले की, वयोवृद्ध नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. गुन्हेगारांना हद्दपार करण्याची प्रक्रियाही प्रभावीपणे राबवली जाईल.

पोलीस अधीक्षकांनी जनतेच्या सहभागावर भर देताना म्हटले, “१०० क्रमांकावर येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची गंभीर दखल घेतली जाईल. मी फक्त एसी चेंबरमध्ये बसून काम करणारा अधिकारी नाही, तर लोकांमध्ये मिसळून काम करण्यास माझी पसंती आहे.” सागरी सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी स्थानिक मच्छिमारांना ‘आमचे कान’ संबोधत, त्यांनी दिलेली माहिती राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाची असल्याचे नमूद केले. तसेच, नागरिकांनी माहिती पुरवावी यासाठी आपले सोशल मिडिया खाते सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.

नितीन बगाटे यांच्या या कठोर आणि लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:17 26-05-2025