लोटे औद्योगिक वसाहतीत कामगार रुग्णालय उभारणार : पालकमंत्री उदय सामंत

खेड : जिल्ह्यातील कामगारांसाठी आरोग्य सुविधा पुरवण्याच्यादृष्टीने लोटे औद्योगिक वसाहतीत कामगार रुग्णालय उभारण्यात येणार असून त्यासाठी पाच एकर जागा एमआयडीसी देणार आहे. याच जागेत औद्योगिक क्षेत्राशी संबंधित सर्व कार्यालये निर्माण करण्याच्यादृष्टीने परिपूर्ण प्रस्ताव लवकरात लवकर तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

त्याचबरोबर दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कारखान्यांची तपासणी करून सदोष कारखान्यांवर कारवाई करा, असे निर्देशही फॅक्टरी इन्स्पेक्टरला दिले. गेल्या आठवड्यात दोन कारखान्यांमध्ये घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मंत्री सामंत यांनी शुक्रवारी चिपळूण, खेड दौऱ्यात लोटे औद्योगिक वसाहतीतील दुर्घटनाग्रस्त कारखान्यांची पाहणी केली. त्यानंतर उद्योगभवन येथे अधिकारी, कारखानदार, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा औद्योगिक वसाहत लोटेत आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), औद्योगिक सुरक्षा विभाग (फैक्टरी इन्स्पेक्टर) ही सर्व कार्यालये चिपळूण, रत्नागिरी आणि कोल्हापूर या ठिकाणी असल्याचा उल्लेख करत हे योग्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे कामगार रुग्णालय उभारणीबरोबरच ही सर्व कार्यालये लोटेतच आली पाहिजेत, त्यासाठी आम्ही जागा उपलब्ध करून देत असल्याने त्या दृष्टीने आराखडा तयार करावा, असे सांगितले.

औद्योगिक वसाहतीत स्फोट, जागीच्या दुर्घटना घडत आहेत. कारखान्यांची तपासणीच होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे फैक्टरी इन्स्पेक्टर यांनी तत्काळ या वसाहतीतीत्त कारखान्याची तपासणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले. त्याचबरोबर सीएसजार फंडावरही उद्योजकांना सुनावले.

या बैठकीवेळी औद्योगिक वसाहतीतील रस्ते, वीज, पाणीपुरवठा याबाबतच्या समस्याही मंत्री सामंत यांच्यासमोर मांडण्यात आल्या. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी, स्थानिकांना रोजगार, प्रदूषण याबाबतचे मुद्दे मांडले. व्यासपीठावर डॉ. प्रशांत पटवर्धन, आर. सी. कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:01 PM 26/May/2025