रत्नागिरी, दि. २६ मे २०२५ : रत्नागिरी शहरात कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वालमवाडी, कर्ला येथील समीक्षा संजय वालम यांच्या नवीन घरासाठी बांधलेली संरक्षक भिंत कोसळली. या घटनेमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
समीक्षा संजय वालम या आपल्या नवीन घराचे बांधकाम करत होत्या आणि त्यासाठी संरक्षक भिंत बांधली होती. मात्र, कालच्या जोरदार पावसामुळे ही भिंत कोसळली, ज्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला. उद्योगमंत्री उदय सामंत हे रत्नागिरीत नसतानाही त्यांच्या कानावर ही बातमी पडताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या. यानुसार, संजय हळदणकर, प्रथमेश साळवी, गणेश भारती आणि चंदन खानविलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन समीक्षा वालम यांना ५० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
याशिवाय, पालकमंत्री उदय सामंत यांनी नगरपालिकेमार्फत या संरक्षक भिंतीचे पुनर्बांधकाम करण्याचे आश्वासन दिले आहे. या त्वरित मदतीमुळे समीक्षा वालम यांना दिलासा मिळाला असून, स्थानिक नागरिकांनी मंत्र्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले आहे.














