रत्नागिरी : पतितपावन मंदिरात शिवरात्रीनिमित्त आयोजित भजन कार्यक्रमात भजनी बुवांचे भागोजीशेठ कीर यांच्या वंशजांनी पुष्पगुच्छ देऊन उत्साहपूर्ण स्वागत केले. यावेळी मोठ्या पावसातही भजनी बुवांनी उत्साहात भजन सादर करत मंदिर परिसर भक्तिमय केला.
यापूर्वी एप्रिल महिन्यातील शिवरात्रीदरम्यान पतितपावन मंदिरात भजनी बुवांना मंदिर प्रवेश नाकारून त्यांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार घडला होता. मंदिर व्यवस्थापकाने “हे मंदिर आमचे आहे, येथे भजन करू नका” असे म्हणत टाळ-मृदुंगासह भजनाला मज्जाव केला होता. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला होता. या घटनेचा निषेध म्हणून भजनी बुवांनी भजन दिंडी आयोजित करून व्यवस्थापकाच्या हिंदू धर्मद्वेषी वर्तनाचा जाहीर निषेध नोंदवला होता. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
आजच्या शिवरात्रीनिमित्त भजनी बुवांनी पुन्हा पतितपावन मंदिरात भजनासाठी हजेरी लावली. यावेळी भागोजीशेठ कीर यांच्या वंशजांनी त्यांचे स्वागत करत मागील घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी घेतली. संजय बुवा मेस्त्री, प्रकाश सुतार, संजय घाटविलकर, सोहम धर्मे, मिरजुळकर बुवा, विकास बुवा भाटकर, दिपक सुर्वे, सुरेंद्र घुडे, साईनाथ नागवेकर, मनोज बुवा भाटकर, सुदेश नागवेकर, आर. के. विलणकर, राजेंद्र बिर्जे, कौस्तुभ नागवेकर, रघुवीर शेलार, प्रकाश हातखंबकर, सत्यवती बोरकर, अस्मिता चवंडे, प्रेरणा विलणकर, अमृता मायनाक, आदिती शिरधनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
भागोजीशेठ कीर यांनी १९३१ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विनंतीवरून पतितपावन मंदिर बांधले होते. हिंदू धर्मातील सर्व समाजांना प्रवेश खुला करणारे हे देशातील पहिले मंदिर होते. त्यांनी बिकानेरपासून गोकर्ण महाबळेश्वरपर्यंत मंदिरे, शाळा, गोशाळा, महिला विद्यालय, धर्मशाळा, अनाथाश्रम, पाणवठे, विहिरी आणि स्मशानभूमी स्वखर्चाने बांधून लोकसेवेसाठी अर्पण केल्या. त्यांनी दादर येथील हिंदू स्मशानभूमीसाठी दान केलेल्या जागेची आजची किंमत ५ हजार कोटींहून अधिक आहे. “सर्व काही भागेश्वराच्या कृपेने मिळाले असून, ते गोरगरिबांचे आहे,” अशी त्यांची धारणा होती.
आजच्या कार्यक्रमात पावसातही भजनी बुवांनी उत्साहात भजन सादर केले. मंदिरात आरतीनंतर भाटये येथील मनोज बुवा भाटकर यांनी नैवेद्य प्रसादाची व्यवस्था केली. या कार्यक्रमाने भक्तांचा उत्साह आणि भागोजीशेठ कीर यांच्या लोकसेवेच्या वारशाला उजाळा मिळाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 27-05-2025














