दापोलीत घरफोडी : लाखोंचा ऐवज लंपास, तिघांवर संशय

दापोली : दापोली तालुक्यातील करंजाणी येथील मावळतवाडी येथे एका बंद घराला लक्ष्य करत चोरट्यांनी २१,६०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घरफोडीमध्ये घराचे मोठे नुकसानही झाले असून, लोखंडी आणि लाकडी दरवाज्यांचे सुमारे २०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी राजेंद्र रघुनाथ कालेकर, संतोष दत्ताराम कालेकर आणि अंतोष दत्ताराम कालेकर (सर्व रा. करंजाणी) या तिघांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला १ मे २०२५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास आपले घर बंद करून मुंबईला गेल्या होत्या. त्यानंतर २४ मे २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता त्या मुंबईहून परत आल्या असता त्यांना धक्काच बसला. त्यांच्या घराच्या समोरील लोखंडी आणि लाकडी दरवाज्याची कडी-कोयंडा तुटलेला दिसला. घरात प्रवेश करून पाहणी केली असता, घरातील मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

चोरट्यांनी २००० रुपये किमतीची चांदीची लक्ष्मी आईची मूर्ती, १०,००० रुपयांची रोकड, २००० रुपये किमतीची पितळेची लक्ष्मी आईची मूर्ती, गणपतीची मूर्ती, जगदंबे आईची आणि सरस्वती आईची मूर्ती, ५००० रुपये किमतीची एल.ई.डी. फ्लॅश लाईट, ६०० रुपये किमतीचे गॅसचे पितळेचे बर्नर आणि २००० रुपये किमतीची किचनमधील ५ ॲल्युमिनियमची भांडी असा एकूण २१,६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

या घटनेनंतर फिर्यादींनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, राजेंद्र रघुनाथ कालेकर, संतोष दत्ताराम कालेकर आणि अंतोष दत्ताराम कालेकर या तिघांनीच ही चोरी केली असावी आणि त्यांनीच घराच्या दरवाजांचे नुकसान केले असावे, असा त्यांना दाट संशय आहे. दापोली पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ (अ), ३२४ (४), ३ (५) नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 27-05-2025