खेड : जगबुडी नदी इशारा पातळीवर

रत्नागिरी : जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी संततधार सुरूच आहे. पावसामुळे पर्यटन व्यवसाय, आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मे महिन्यात आठ दिवसांच्या पावसाने विहिरी भरण्याचे दुर्मीळ चित्र पाहायला मिळाले. खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. चिपळूणमध्ये नदीत मासेमारीला गेलेल्यांच्या जीवावर बेतलेल्या तिघांचे प्राण वाचवण्यात बचाव पथकाला यश आले. मंडणगडमध्ये मुसळधार पावसाचा फटका बसून घर कोसळले आहे. दापोलीत पुराच्या पाण्यातून एक जण वाहून गेला.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात मंगळवारपासून पूर्वमोसमी पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे मात्र तसेच पर्यटन व्यावसायिकांनाही फटका बसला आहे. खेडमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. किनारी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंडणगड तालुक्यात मुसळधार पावसाचा फटका बाणकोट, वेसवी, वाल्मिकीनगर गावातील घरांना बसला. मातीचे एक घर पूर्ण कोसळले, तर दुसऱ्या एका घरावर संरक्षण भिंत कोसळली आहे.

चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील नदीमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलासह तिघांना चार तासांनंतर सुरक्षित बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश. ही घटना रविवारी रात्री घडली. दापोली तालुक्यातील वनौशीतर्फ नातू येथील जनावरांचा गोठा कोसळला. यामध्ये एक गाय दगावली, तर पाच जनावरे जखमी झाली. दापोलीतील राजेंद्र सोनू कोळंबे (वय ४९) रात्रपाळी आटोपून सायकलवरून घरी परत जाताना नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. चिपळूण तालुक्यालाही पावसाचा फटका बसला आहे.

या पावसामुळे वाशिष्ठी नदीपात्राची पाणी पातळी वाढली आहे. दहिवली येथे विहीर कोसळून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 27/May/2025