मंडणगड : मंडणगड तालुक्यात रविवारपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका तालुक्यातील बाणकोट, वेसवी, वाल्मीकीनगर गावातील घरांना फटका बसला असून, घरांचे मोठे नुकसान झाले. मातीचे एक घर पूर्णतः कोसळले तर एका घरावर संरक्षण भिंत कोसळून घराचे मोठे नुकसान झाले आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसाची तालुक्यात २४ तासांत तब्बल विक्रमी २११ मिमी पावसाची नोंद झाली.
सोमवारीही मुसळधार पाऊस सुरूच होता. अनेक ठिकाणी नुकसानाची नोंद झाली असून, त्यांच्या पंचनाम्यांचे सोपस्कार महसूल विभागाच्या वतीने सुरू आहेत. सक्रिय झालेल्या मॉन्सूनने सुरुवातीलाच मुसळधार बॅटिंग केल्याने तालुक्यातील जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे.
बाणकोट येथील ललिता पिंपळकर यांचे मातीचे घर पूर्णतः पावसामुळे कोसळले असून, घराचे सुमारे १ लाख ४३ हजारांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घरात कोणीही सध्या राहत नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुदैवाने येथील विष्णू मोहिते यांच्या घराचा काही भाग कोसळल्यामुळे घराला तडा गेला असून, त्यांचे ५७ हजारांचे नुकसान झाले आहे. सुरक्षेच्यादृष्टीने त्यांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. वाल्मीकीनगर येथे नासीर बेग यांच्या घरावर मोठा दगड कोसळून पडल्याने घराच्या भिंतीला तडे गेले त्यामुळे त्याने ५४ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल आहे वेसवी येथील रस्त्यालगत असलेल्या धबधब्याचा प्रवाह वाढल्याने त्याचे पाणी रस्त्यावर आले होते. काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. रविवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर एवढा होता की, पहिल्याच पावसात तालुक्यातील प्रमुख असलेल्या भारजा नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली. निवळी नदीही दुथडी भरून वाहू लागली. धबधबेही प्रवाहित झाले आहेत.
कामे खोळंबली
यंदा मॉन्सून लवकर सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांसह बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्यांची कामे खोळंबली आहेत. रोहिणी नक्षत्राअगोदरच सुरू झालेल्या या मॉन्सूनपूर्व पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 27/May/2025














