बीएसएनएलचे एक लाख ग्राहक तुटले, लॅण्डलाईन कायमची बंद होणार

रत्नागिरी : एकेकाळी महाराष्ट्रातील सर्वाधिक बीएसएनएल ग्राहक असलेले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे आता या सेवेच्या कोलमडलेल्या अवस्थेमुळे ग्राहक गमावत आहेत. गेल्या काही वर्षांपासूनच्या खराब सेवेमुळे बीएसएनएलने तब्बल एक लाख ग्राहक गमावले आहेत, जे आता खासगी कंपन्यांकडे वळले आहेत. केंद्र शासनाच्या दिरंगाईमुळे कंपनीला हा मोठा फटका बसला आहे. मात्र, आता फोर-जी सेवा सुरू केल्याने बीएसएनएलला पुन्हा चांगले दिवस येण्याची आशा निर्माण झाली आहे.

एक लाख ग्राहक तुटले, संख्या तीन लाखांवर घसरली
रत्नागिरी जिल्ह्यात एकेकाळी तीन लाखांहून अधिक ग्राहक असलेल्या बीएसएनएलची संख्या आता ३ लाख ५० हजारांवरून सुमारे तीन लाखांपर्यंत घसरली आहे. मधल्या काळात कंपनीची सेवा मोठ्या प्रमाणात कोलमडली आणि खासगी कंपन्यांनी मोफत सेवा देण्यास सुरुवात केल्यामुळे बीएसएनएलचे ग्राहक मोठ्या संख्येने तुटले. स्थानिक मुख्य प्रबंधकांनीही याला दुजोरा दिला आहे. कंपनीला याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

फोर-जी मुळे नवसंजीवनीची आशा
केंद्र शासनाने आता बीएसएनएलला नवसंजीवनी देण्यासाठी फोर-जी सेवा सुरू केली आहे. यामुळे अनेक ग्राहक पुन्हा बीएसएनएलकडे वळण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात १८८ नवीन टॉवर उभारले जात असून, त्यापैकी १०६ टॉवरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित टॉवरही लवकरच कार्यान्वित होतील अशी अपेक्षा आहे. यामुळे सेवेची गुणवत्ता निश्चितच सुधारेल.

लॅण्डलाईन सेवा कायमची बंद होणार
दरम्यान, जिल्ह्यातील बीएसएनएलची लॅण्डलाईन सेवा आता कायमची बंद करण्याचे आदेश आले आहेत. सध्या जिल्ह्यात ५५० लॅण्डलाईन फोन अजूनही कार्यरत आहेत, ज्यांचा वापर ग्रामीण भागातील, मोबाईल रेंज नसलेल्या ठिकाणी आणि काही कार्यालयीन कामकाजासाठी केला जातो. परंतु, येत्या काळात ही सेवा पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अडचणींचा डोंगर कायम
फोर-जी सेवा सुरू झाली असली तरी, बीएसएनएलसमोर अजूनही अनेक अडचणी आहेत. शिवसेना माजी खासदार विनायक राऊत यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत या अडचणी समोर आल्या होत्या. अनेक टॉवरचे वीज बिल भरलेले नाही, काहींना बॅकअपसाठी बॅटरी नाही, सोलर पॅनल नाही, फायबर केबल नाही, तर काहींचे काम पूर्ण होऊनही वरिष्ठ विभागाकडून टॉवर सुरू करण्याची परवानगी मिळालेली नाही. या अडचणींमुळे सेवेवर परिणाम होत आहे. तसेच, फोर-जी सेवा चांगली देण्यासाठी कंपनीकडे मनुष्यबळाची मोठी कमतरता असल्याने त्याचाही परिणाम सेवेवर दिसून येत आहे. बीएसएनएल ही सर्वसामान्यांची कंपनी मानली जाते आणि तिची सेवा सुधारल्यास ग्राहकांना निश्चितच फायदा होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 27-05-2025