पावसाळ्यापूर्वी संगमेश्वरमध्ये वाळू-चिऱ्यांचा बेकायदा साठा; महसूल प्रशासन सुस्त, पर्यावरणप्रेमी आक्रमक!

संगमेश्वर : पावसाळ्याच्या तोंडावर संगमेश्वर तालुक्यात वाळूमाफिया आणि चिरेखाण व्यावसायिकांनी बेकायदा वाळू आणि चिऱ्यांच्या दगडांचा मोठ्या प्रमाणावर साठा केला आहे. पावसाळ्यात या वस्तूंची मागणी वाढते आणि याचाच फायदा घेत चढ्या दराने विक्री करून अधिक पैसे कमावण्याचा यांचा उद्देश आहे. महसूल प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी, यासाठी पर्यावरणप्रेमींचे एक शिष्टमंडळ लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे यांनी दिली.

नियम धाब्यावर, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला
महसूल खात्याचे सर्व कायदे आणि नियम धाब्यावर बसवून हा गौण खनिजाचा साठा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महसूल विभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप भायजे यांनी केला आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा रॉयल्टी बुडत असून, ही शासनाची मोठी आर्थिक फसवणूक आहे.

माखजन-करजुवे परिसरात बेकायदा उत्खनन वाढले
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून माखजन आणि करजुवे परिसरातील खाडीत व आसपासच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाचे बेकायदा उत्खनन होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अनेक जणांनी वाळू आणि चिऱ्यांच्या दगडांचा बेकायदेशीरपणे साठा केला आहे. माखजन, सरंद आणि धामापूर या गावांमध्ये गौण खनिजाचा हा साठा मोठ्या प्रमाणावर दिसतो आहे.

पावसाळ्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न
पावसाळ्यात बांधकाम साहित्यासाठी वाळू आणि चिऱ्यांचे दगड सहज उपलब्ध होत नाहीत. याच संधीचा फायदा घेण्यासाठी वाळूमाफिया आणि चिरेखाण व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर साठा करत आहेत, जेणेकरून ते चढ्या दराने विक्री करून नफा कमवू शकतील. सुरेश भायजे यांनी या बेकायदा साठवणुकीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून शासनाचा महसूल बुडणार नाही आणि पर्यावरणही जपले जाईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 27-05-2025