खेड : पावसाळ्यात जगबुडी नदीला पूर आल्यानंतर बचावकार्य कोणत्या पद्धतीने करायचे, याबाबत येथील नगरप्रशासनाकडून विसर्जन कट्टा व अलसफा फाउंडेशनच्या सदस्यांना जगबुडी नदीत आपत्कालीन प्रात्यक्षिके दाखवण्यात येत आहेत.
सातारा येथील अमोल जाधव व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी ८ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. शनिवारी तहसीलदार सुधीर सोनावणे आणि मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला. धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदीने थोक्याची पातळी ओलांडताच नदीकाठच्या रहिवाशांना स्थलांतराच्या सूचना करणे, पुराचे पाणी मुख्य बाजारपेठेसह नदीकाठच्या घरांमध्ये घुसल्यानंतर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठीचे बचावकार्य प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दाखवण्यात आले.
यात विसर्जन कट्टा व अलसफा वेल्फेअर फाउंडेशनचे सदस्य व अन्य पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी सहभाग घेतला. या प्रशिक्षणातून तरुणांना अनेक बाबी उमगून उत्तम प्रशिक्षण मिळत असल्याचे विसर्जन कट्टाचे संतोष शिंदे यांनी सांगितले. प्रत्यक्ष नदीपात्रात प्रशिक्षणकर्ते अमोल जाधव व सहकाऱ्यांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी दोन बोटींसह आवश्यक ती साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत सर्वप्रथम स्वतःचा जीव कसा वाचवायचा, पुरात अडकलेल्यांचा जीव वाचवताना कोणती खबरदारी घ्यायची, मदत करताना साप चावल्यास काय करायचे यांसह अन्य आपत्कालीन प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली. या वेळी नगर पालिकेचे नागेश बोंडले यांच्यासह अग्निशमन दल व नगर पालिकेतील कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 27/May/2025














