संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, चार तास वाहतूक ठप्प; ठेकेदार कंपनीच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ येथे रविवारी (२५ मे रोजी) सायंकाळी डंपर आणि खासगी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातामुळे महामार्गावर तब्बल चार तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु ठेकेदार कंपनी आणि महामार्ग प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला.

वारंवार होणारे अपघात आणि प्रशासनाचे दुर्लक्ष
तुरळ परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून, याकडे महामार्ग प्रशासन आणि संबंधित ठेकेदार कंपनी सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. या मोठ्या अपघातानंतरही घटनास्थळी ठेकेदार कंपनीचा किंवा महामार्ग प्रशासनाचा एकही अधिकारी फिरकला नाही, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या प्रयत्नाने वाहतूक सुरळीत
अपघातानंतर झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी स्वतःच वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी उचलली. संतोष थेराडे, राजेंद्र सुर्वे, जितेंद्र चव्हाण, नंदकुमार फडकले, विजय कुवळेकर, अरविंद जाधव आणि दत्ताराम ओकटे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत अथक प्रयत्न केले. त्यांच्या चार तासांच्या प्रयत्नानंतर अखेर वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.

ठेकेदार कंपनीला इशारा
वाहतूक कोंडी असतानाही ठेकेदार कंपनी किंवा महामार्गाचे अधिकारी घटनास्थळी फिरकले नाहीत याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “ठेकेदार कंपनी कोणत्याही प्रकारची पावले उचलत नाहीत. यापुढे जनता रस्त्यावर उतरून धडा शिकवेल,” असा इशारा संतोष थेराडे यांनी दिला आहे. महामार्गावरील अपघातांची वाढती संख्या आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 27-05-2025