चिपळूण : तालुक्यात रविवारी पावसाने चांगलाच जोर पकडला असून, दहिवली-बुद्रुक येथील कातळवाडी येथील संजय राजाराम घाग यांच्या विहिरीचे दगडी बांधकाम कोसळून सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्याने घरांवर, शाळांवर झाडे पडून नुकसानीच्या घटना घडत आहेत. शनिवारी रात्री पडलेल्या पावसामुळे घाग यांच्या विहिरीचे दगडी बांधकाम कोसळून मोठे नुकसान झाले. ही घटना रात्री घडली असून, तलाठ्यांनी पंचनामा करून आपला अहवाल तहसीलदारांना पाठवला आहे. अन्य काही गावांमध्येही किरकोळ पडझडीच्या घटना घडल्या असल्या तरी, त्यांची तहसीलदार कार्यालयात नोंद झालेली नाही.
रविवारी सकाळपासून दुपारपर्यंत पावसाचा जोर कमी होता. मात्र दुपारनंतर पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. रात्री उशिरापर्यंत दमदार पाऊस पडत होता. यामुळे अनेक गावातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत होता. पावसाचा जोर वाढल्याने बाजारपेठेतही शुकशुकाट पसरला होता.
रविवारी तालुक्यात २६.११ मि.मी. पाऊस पडला असून, त्यात चिपळूण मंडळात १४ मि.मी., खेर्डी-१८ मि.मी., वहाळ-४० मि.मी., कळकवणे-२० मि.मी., मार्गताम्हाणे-२३ मि.मी., शिरगांव-३४ मि.मी., रामपूर-२६ मि.मी., असुर्डे-२४ मि.मी. आणि सावर्डे-३६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत तालुक्यात एकूण २५२.०९ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद तहसीलदार कार्यालयात झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 27/May/2025














