राजापूर : तालुक्यातील पेंडखळे येथील पेंडखळकरवाडीमधील मंदिराजवळील ब्राम्हणदेव वहाळावरील मोडकळीस आलेला लोखंडी साकव शनिवारी (२४ मे रोजी) झालेल्या मुसळधार पावसात कोसळला. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नसली तरी यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे. या घटनेची तात्काळ दखल घेत आमदार किरण सामंत यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला साकव तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत, तर तहसीलदार विकास गंबरे यांनीही कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.
तीन वर्षांपासून मागणी, अखेर कोसळला
पेंडखळे येथील ब्राम्हणदेव वहाळावरील हा साकव गेली तीन वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. साकवाची दुरवस्था झाली असून, त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ सातत्याने करत होते. ग्रामपंचायतीने याबाबत ठराव करूनही संबंधित विभागाने याकडे लक्ष दिले नव्हते. अखेर शनिवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे हा साकव पूर्णपणे मोडून पडला, ज्यामुळे ग्रामस्थांची वाहतुकीची मोठी गैरसोय झाली आहे.
आमदार सामंत यांच्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर कार्यवाही
आमदार किरण सामंत यांनी या घटनेची तातडीने दखल घेतली. त्यांनी संबंधित विभागाला साकवाची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या, तसेच हा साकव तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी भालचंद्र भालेकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. साकव दुरुस्त करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, लवकरच ग्रामस्थांची गैरसोय दूर होईल अशी अपेक्षा आहे. या घटनेमुळे प्रशासकीय दिरंगाईचा फटका पुन्हा एकदा सामान्य नागरिकांना बसल्याचे चित्र समोर आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 27-05-2025














