चिपळूणमध्ये नळाला चक्क मासे! नागरिकांकडून ‘नगर परिषद कृपेने चढणीचे मासे’ असा उपरोधिक विनोद व्हायरल

चिपळूण, ता. २७ मे २०२५: चिपळूण शहरातील उपनगर मार्कंडी भागात नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेतून थेट नागरिकांच्या घरात नळावाटे बारीक मासे येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांनी याबाबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत, “आता चढणीचे मासे थेट नळाद्वारे नागरिकांच्या घरात” असा उपरोधिक विनोद केला आहे.

पावसाळ्यातील ‘चढणीचे मासे’ आता नळावाटे?
पावसाळा सुरू झाला की, चिपळूण शहर परिसरात पाणथळ जागा, नाले आणि पन्ह्यांमध्ये मासे पकडण्यासाठी नागरिक रात्रभर जागतात. वाहत्या प्रवाहाच्या विरोधात मासे पकडण्याची एक खास पद्धत असते, ज्याला ‘चढणीचे मासे’ पकडणे असे म्हणतात. यात काळोखात प्रखर प्रकाशाच्या बॅटऱ्या लावून माशांना दिपवून जाळ्याने पकडले जाते. मात्र, आता हेच ‘चढणीचे मासे’ थेट नगर परिषदेच्या नळजोडणीतून घरात येत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सोशल मीडियावर नागरिकांचा संताप आणि विनोद
घरात नळाच्या पाण्यातून मासे आल्याचे पाहिल्यावर नागरिकांनी तात्काळ याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केले. यावर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट करत नगर परिषदेच्या पाणीपुरवठ्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. “आता नगर परिषदेच्या कृपेने नागरिकांच्या घरात थेट मासे येऊ लागले आहेत,” असा उपरोधिक विनोद करत नागरिकांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. पाण्याच्या शुद्धतेबाबत आणि नगर परिषदेच्या कार्यपद्धतीबाबत या घटनेमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 27-05-2025