चिपळुणात भात आणि नाचणीचे सुधारित बियाणे मोफत

चिपळूण : आपल्या शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम २०२५ मध्ये ‘नाविन्यपूर्ण बाबी’ या योजनेंतर्गत चिपळूण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी भात आणि नाचणीचे सुधारित बियाणे पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांसाठी खर्च करावा लागणार नाही, ज्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि पिकांची गुणवत्ताही सुधारेल.

भातासाठी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने, दापोलीने विकसित केलेले ‘रत्नागिरी-०८’ हे अधिक उत्पादन देणारे वाण मिळेल. नाचणीसाठी ‘दापोली-०२’ हे सुधारित वाण मोफत दिले जाईल.

या संधीचा लाभ घेण्यासाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, कृषी सेवक किंवा थेट तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. बियाणे मिळवण्यासाठी Agristack योजनेअंतर्गत मिळालेला आपला शेतकरी ओळख क्रमांक, सातबारा आणि ८अ, आधार कार्ड, विहित नमुन्यातील अर्ज आदी कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतीत क्रांती घडवा आणि समृद्धीकडे वाटचाल करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 27/May/2025