मंडणगड : रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर मंडणगड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने हा रोहिणी नव्हे तर भात लावणीचा पाऊस अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटल्या. रविवारी (ता. २५) पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पेरणीचा मुहूर्त साधता आला नाही. शेत शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने यंदाची पेरणी लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तीन दिवस तालुक्यात पाऊस पडत आहे. आज दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढला. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. रस्त्याच्या बाजूला गटारे काढण्यात न आल्याने मंडणगड-वाणकोट मार्गावर रस्त्यावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागली. रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त साधून भात पेरणी करण्याची वर्षानुवर्षाची परंपरा पावसामुळे खंडित झाली.
कोरडे पडलेले ओढे, नाले प्रवाहित झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. पाऊस असाच सुरू राहिल्यास शेतकऱ्यांपुढे पेरणीचे संकट उभे राहणार आहे. धूळवाफ पेरणी करता येणार नाही, परिणामी शेतकरी वर्ग चिंतेत आहे. अनेक ठिकाणी पडझड झाल्याच्या घटना घडल्या. तालुक्यात १०२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पावसाचे रूप पाहिले तर हा चिखलणी करण्यासारखा पडत आहे. पेरणी कशी करायची हाच प्रश्न समोर आहे. पेरणी योग्य वातावरण तयार झाले नाही तर यावर्षीची पेरणी संकटात येणार आहे. पाऊस लवकर सुरू झाल्याने आंबा पिकांपासून मिळणारे उत्पन्न घटले आता भात पिकांवरही तीच परिस्थिती आहे. शासनाने शेतकऱ्यांचा विचार करावा – समीर पारधी, शेतकरी, मंडणगड.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 27/May/2025














