चिपळूण : यंदाच्या पावसाळ्यात तब्बल १८ दिवस धोक्याचे असून, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत १९ वेळा महाकाय अर्थात् साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा येऊन समुद्राला मोठी भरती येणार आहे. या दरम्यान मुसळधार पाऊस झाल्यास चिपळूण शहरात महापूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अरबी समुद्राला भरती असेल आणि त्याचदरम्यान मुसळधार पाऊस आणि कोयनेचे पाणी वाशिष्ठी नदीत सोडले गेले, तर वाशिष्ठी खाडीत पाण्याचा फुगवटा मारतो आणि वाशिष्ठीचे पाणी शिवनदीमार्गे शहरात येते. त्यानंतर पूरपरिस्थिती निर्माण होते.
मोठ्या भरतीच्या दिवशी मुसळधार पाऊस आणि भरती एकाचवेळी आल्यास जिल्ह्यातील समुद्रकिनारीचा भाग जलमय होण्याची भीती वर्तवली जात आहे. त्याचबरोबर चिपळूण शहरात पूर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे जून आणि ऑगस्टमध्ये पाच दिवस अधिक उंचीच्या लाटा येणार आहेत, तर सप्टेंबरमध्ये चार दिवसांत पाचवेळा लाटा येणार आहेत तसेच जुलैतही चार दिवस सर्वात उंचीच्या लाटांसह भरती येणार आहे.
पावसाळ्यातील १८ दिवसांच्या कालावधीत १९ वेळा साडेचार मीटरपेक्षा मोठ्या लाटा येणार आहेत. यामध्ये सर्वात मोठी लाट ही २६ जूनला दुपारी १२.५५ मिनिटांनी ४.७५ मीटरची येणार आहे, तर सर्वात लहान लाट ही १० ऑगस्ट रोजी दुपारी १२.४७ येणार आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी पावसाच्या घडामोडीचा अंदाज घेतला जातो. त्यात भरतीचे दिवस कोणते, लाटांची उंची किती या सर्व घडामोडींचा आढावा घेण्यात येतो. अतिवृष्टीत अचानक घडणाऱ्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी नियोजन केले जाते. यंदाच्या पावसाळ्यात १८ दिवस सर्वात मोठी भरती येणार असून, त्यावेळी साडेचार मीटरपेक्षाही अधिक उंचीच्या लाटा येण्याची शक्यता असल्याचा अंदाज जिल्हा आपत्कालीन विभागाने वर्तवला आहे.
पुराचा सामना करण्यासाठी चिपळूण पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज आहे. मुसळधार पाऊस आणि महापूर रोखता येत नाही; मात्र नागरिकांचे कमीत कमी नुकसान होईल, याची काळजी आम्ही घेत आहोत. पावसाचा अंदाज आम्ही नागरिकांना देणार आहोत. प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे-मंगेश पेढामकर, प्रशासकीय अधिकारी चिपळूण पालिका
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 27/May/2025














