चिपळूण : मटण-मासळी मार्केटबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे इनायत मुकादम यांची धाव

चिपळूण : येथे नगर परिषदेतर्फे नव्याने सुरू होत असलेल्या मटण-मासळी मार्केट प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण व मानवी आरोग्यास उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत माजी स्वीकृत नगरसेवक इनायत मुकादम यांनी उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन दिले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता केल्याशिवाय हा प्रकल्प सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दुतर्फा वाहणाऱ्या वाशिष्ठी नदी किनाऱ्यालगत नवीन बांधकाम झालेल्या मटण-मच्छी मार्केट इमारतीमध्ये लवकरच लिलाव प्रक्रियेद्वारे कत्तलखाना सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे. ज्या इमारतीमध्ये मटण-मच्छी व्यवसाय करायचा आहे, ती इमारत वाशिष्ठी नदी किनाऱ्यालगत असून, किंबहुना नदीपात्रातच आहे.

नगर परिषदेच्या या इमारतीमध्ये मटण-मच्छी व चिकन व्यवसाय करण्याकरिता सुमारे ५० हून अधिक दुकानगाळे उपलब्ध आहेत. लवकरच लिलाव प्रक्रिया होऊन पात्र व्यावसायिकांना दुकान गाळ्यांचे वितरण होणार आहे. या मटण-मच्छी मार्केट प्रकल्प इमारतीची पाहणी केली असता, याठिकाणी मानवी आरोग्याच्या दृष्टीने अनेक गंभीर समस्या निदर्शनास येत आहेत, असे मुकादम यांनी निवेदनात म्हटले आहे.

योग्य सुविधांअभावी इमारतीमधील सांडपाणी नदीत झिरपण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. साहजिकच मोठ्या प्रमाणात रोगराईचा प्रार्दुभाव होऊन वाशिष्ठी नदीपात्रातून दुतर्फा वाहणारे पाणी दूषित होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 27/May/2025