सांस्कृतिक, सामाजिक वैभव जपणे गरजेचे : प्रशांत यादव

आरवली : येणाऱ्या काळात सांस्कृतिक व सामाजिक वैभव जपणे ही काळाची गरज आहे. ही गरज भजनी, भारूड वा अशा प्रकारच्या कांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. यातून गावातील एकोपा टिकला पाहिजे, असे प्रतिपादन चिपळुणातील वाशिष्ठी मिल्क अॅन्ड मिल्क प्रॉडक्टचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले.

संगमेश्वर तालुक्यातील कडवई ओकटेवाडीचे राजेश्वरी भजनी भारूड मंडळातर्फे गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रशांत यादव बोलत होते. या मंडळात काम करणाऱ्या बालकलाकारांना शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रशांत यादव पुढे म्हणाले की, ज्या मुलांचा सत्कार आपण केला ती मूल उद्याच्या भारताचे भविष्य आहे. या उपक्रमामुळे एक चांगला समाज निश्चित निर्माण होईल. मेहनत करणारा विद्यार्थीच चांगलं यश संपादन करू शकतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी सहदेव बेटकर, राष्ट्रीय कबड्डीपटू चंद्रकांत जाधव, अरविंद जाधव, शाहीर विजय कुवळेकर, माजी सभापती कृष्णा हरेकर यांनी ही मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला माजी सरपंच वसंत उजगावकर, माजी सरपंच बापू कदम, माजी उपसरपंच संतोष जाधव, अनंत उजगावकर, दत्ता लाखण, तंटामुक्ती अध्यक्ष महेश जाधव, कडवईचे गावकर, गावचे पुजारी संतोष गुरव उपस्थित होते. कार्यक्रमात मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या व्यक्तींनाही सन्मानित करण्यात आले.

नरेश ओकटे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विष्णू ओकटे, संतोष गोरीवले, गजानन ओकटे, समीर इंजळे, संतोष राक्षे, दिलीप जोयशी, मंगेश ओकटे, शांताराम ओकटे, दिलीप गोरीवले, संदीप इंजळे, सचिन ओकटे, रमेश भायजे, अजय राक्षे, ऋषी ओकटे यांनी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 27/May/2025