चिपळूण : कळंबस्ते रेल्वे फाटक ३४ वेळा बंद

चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावर जिल्ह्यातील एकमेव चिपळूण कळंबस्ते रेल्वे फाटक असून, हे फाटक दिवसभरात ३४ फेऱ्यांसाठी बंद ठेवावे लागते. या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी ३२ वर्षांपासून केली जात आहे. त्याप्रमाणे सुमारे २० कोटी ५२ लाखाच्या निधीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मात्र, अद्याप निधीची तरतूद होत नसल्याने चिपळूणसह खेड पंधरागावच्या प्रवाशांचा नियमित खोळंबा होत आहे.

कळंबस्ते रेल्वे फाटकाला सुरुवातीपासूनच विरोध आहे. या फाटकामुळे चिपळूण व खेड तालुक्यातील २१ गावे अडचणीत आली आहेत. दिवसभरात १७ रेल्वे गाड्यांच्या ३४ फेऱ्या दररोज होतात. या प्रत्येक फेरीसाठी किमान १० ते १५ मिनिटे हे फाटक बंद ठेवले जाते. याशिवाय जादा गाड्यांसाठीही फाटक बंद होते.

या ठिकाणी उड्डाणपूल होण्यासाठी सुमारे २० कोटी ५२ लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. पूल निर्मितीचे कार्य राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत भूसंपादन प्रक्रियेसह आणि निधीच्या उपलब्धतेनुसार पूर्ण करण्याचे प्रयोजन केले आहे.

वाहतूककोंडीची समस्या
कळंबस्ते गाव महामार्गाशी जोडलेला असल्याने पंधरा गावे विभागात ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्याही अधिक आहे. मात्र, या मार्गावर रेल्वे फाटक असल्याने वाहतूककोंडी होते. त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो.

गेली ३२ वर्षे दुर्लक्ष
गेल्या ३२ वर्षांत अनेक लोकप्रतिनिधींनी कळंबस्ते रेल्वे फाटकाच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली आहे. मात्र, इतकी वर्षे या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

कधी स्कूल बस तर कधी रुग्णवाहिकेचा खोळंबा
दिवसातून ३४ वेळा फाटक पडत असल्याने या भागातून चिपळूणमध्ये येणारी स्कूल बस, तर कधी रुग्णवाहिका अडकून पडते. त्याशिवाय विंचू, सर्पदंश झालेले व हृदयविकाराचे रुग्ण वाहतूककोंडीत अडकून पडतात.

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करू, अशी घोषणा केली आहे. त्याप्रमाणे कळंबस्ते येथे उड्डाण पूल उभारावा-शौकत मुकादम, अध्यक्ष, कोकण रेल्वे तक्रार निवारण समिती, चिपळूण.

कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांची संख्या वाढत असल्याने कळंबस्ते रेल्वे फाटकाची समस्या गंभीर होत चालली आहे. त्यामुळे उड्डाण पूल गरजेचा आहे- शंकर सावर्डेकर, काडवली, खेड

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:49 PM 27/May/2025