महावितरणच्या रत्नागिरी मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता पदी सुनीलकुमार माने यांची नियुक्ती

रत्नागिरी : महावितरणच्या रत्नागिरी मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता पदी सुनीलकुमार माने यांनी आज (दि.२६ मे) रोजी पदभार स्वीकारला. यापूर्वी कार्यरत असलेले अधीक्षक अभियंता वैभवकुमार पाथोडे यांची नागपूर प्रादेशिक कार्यालयात बदली झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर सुनीलकुमार माने यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. यावेळी बोलताना सुनीलकुमार माने यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील मूलभूत वीज यंत्रणा अधिक सक्षम करत वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा मानस व्यक्त केला.

सुनीलकुमार माने यांनी सन १९९४ मध्ये तत्कालीन एमएसईबी मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून आपल्या सेवेला सुरुवात केली. त्यानंतर पदोन्नतीने त्यांनी सहाय्यक अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता अशा विविध पदांवर कोल्हापूर, कल्याण, रत्नागिरी, सातारा येथे आपली सेवा बजावली आहे.

त्यांना वीज क्षेत्राचा प्रदीर्घ असा तीस वर्षांचा अनुभव आहे. कोल्हापूर शहर विभागात कार्यकारी अभियंता पदावर असताना, त्यांनी वीज देयके, वसुली आणि वीज हानी यांसारख्या विषयांवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कोल्हापूर शहरातील शिरोली एमआयडीसीतील औद्योगिक ग्राहकांचे विविध प्रश्न सोडवून, १५ किलोमीटर खराब उच्चदाब वाहिनी बदलून त्यांनी अत्यंत कमी कालावधीत औद्योगिक ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठा सुरू केला.

कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर परिसरातील उच्चदाब वाहिनी व लघुदाब वाहिनी भूमिगत करणे तसेच महालक्ष्मी मंदिर परिसरातील धोकादायक रोहित्रे स्थलांतरित करण्याचे काम त्यांनी युद्धपातळीवर पूर्ण केले. त्यांच्या या कार्याबद्दल तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकारी राहुलजी रेखावार यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले होते. सुनीलकुमार माने यांच्या नेतृत्वात कोल्हापूर शहर विभागात प्रस्तावित १०० इलेक्ट्रिक बस चार्जिंगचा प्रकल्पाची निविदा प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करून प्रत्यक्ष कामास सुरुवात व ७५ टक्के कामाची पूर्तता करणारा राज्यातील एकमेव विभाग ठरला आहे. त्यांच्या या विशेष योगदानाबद्दल कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त व खासदार धनंजय महाडिक यांनीही त्यांचे कौतुक केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:56 PM 27/May/2025