संगमेश्वर परिसरात मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे त्वरित भरा; उबाठा ठाकरे शिवसेनेचे पोलिसांना निवेदन

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या संगमेश्वर परिसरातील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संगमेश्वर पोलिस ठाणे तसेच महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला निवेदन देण्यात आले.

ठाकरे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, जिल्हा संघटक संतोष थेराडे, तालुकाप्रमुख नंदादीप बोरूकर, अजित गवाणकर, दिलीप पेंढारी, प्रकाश घाणेकर, वैभव मुरकर, विजय कुवळेकर, जनार्दन जनार्दन रहाटे, विजय रहाटे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना निवदेन दिले. संगमेश्वर ते आरवलीदरम्यान पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून, याला जबाबदार असलेल्या ठेकेदार कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

चौपदरीकरणाच्या कामात प्रचंड ढिसाळपणा असून, अनेक ठिकाणी अपूर्ण काम, अपुरे पथदिवे आणि उघडे खड्डे नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. दोन दिवसांच्या आत या परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर अचानक रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाने दिला आहे. या वेळी दिलेल्या निवेदनात प्रशासन आणि ठेकेदार कंपनीने त्वरित उपाययोजना करून नागरिकांच्या जीवित सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 28/May/2025