कोकणात ओला दुष्काळ जाहीर करावा : आमदार शेखर निकम

चिपळूण : कोकणात मॉन्सूनपूर्व आलेल्या पावसात भात व आंबापिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा. शासनाने शेतकऱ्यांना मदत देऊन त्यांना आधार द्यावा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागांत यंदा हवामानाच्या अनियमिततेमुळे पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे विविध समस्या उद्भवल्या असून, त्यावर तातडीने शासनपातळीवर उपाययोजना होणे आवश्यक आहे.

कोकणातील भात हे मुख्य पीक असून, अवेळी आलेल्या आणि सलग पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना भातपेरणी करणे अशक्य आहे. अनेक ठिकाणी शेतीची मशागत होण्याआधीच अतिवृष्टी झाल्यामुळे रोपांची पेरणीच झालेली नाही. त्यामुळे हजारो शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या परिस्थितीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते.

शासनाने त्वरित परिस्थितीचा आढावा घेऊन कोकणातील शेतकऱ्यांकरिता ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत व विम्याची भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार निकम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

बागायतदारांना दिलासा द्या
कोकणातील आंबा उत्पादकांना शेतकऱ्यांच्या बागेतील आंबा यंदा अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे विक्री करता आला नाही. त्यामुळे आंबा उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले असून, निर्यातीवरही परिणाम झाला आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त आंबा उत्पादकांना आर्थिक मदत आणि विमा भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार निकम यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 28/May/2025