रत्नागिरी रेल्वेस्थानकात गळती सुरू

रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या जोरदार कोसळणाऱ्या पावसाने सलग दुसऱ्या वर्षी येथील अत्याधुनिक रेल्वेस्थानकाला दणका दिला. दर्शनीभागातील इमारतीच्या छतातून पुन्हा पाणीगळती सुरू झाली आहे. त्यामुळे सुशोभीकरणाच्या गुणवत्तेवर येथील प्रवासीवर्गातून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात वादळी पाऊस झाला होता. या पावसाने रत्नागिरी रेल्वेस्थानकावरील नवीन बसवलेल्या छताला आणि क्लॅडिंगचे मोठे नुकसान झाले होते. सायंकाळी झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे टिनचे पत्रे उडून गेले आणि क्लॅडिंग कोसळले होते. यामुळे सुमारे १५ ते २० चौरस फूट छतावर परिणाम झाला होता.

या रेल्वेस्थानकाच्या पश्चिम प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात सुरू होते. राज्य सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या सुशोभीकरण प्रकल्पाचे काम केले होते. त्यादरम्यान संपूर्ण काम पूर्ण होण्यापूर्वीच छताचे नुकसान झाले होते. गेल्या आठवडाभरापासून रत्नागिरीत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रेल्वेस्थानकाच्या सुशोभीकरण केलेल्या इमारतीच्या कामाला पुन्हा एकदा जोरदार तडाखा दिला आहे. इमारतीचा दर्शनी भाग आणि प्रवेशद्वाराच्या पूर्वेकडील बाजूला सुशोभीकरणात नवीन बसवलेल्या छताला आणि क्लॅडिंगमधून गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा जोरदार पाणीगळती सुरू झाली. रेल्वेस्थानकातील पाणीगळतीच्या गंभीर प्रकाराबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवण्यात आले आहे.

त्यानंतर छताला लागलेली पाणी गळती काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची चांगलीच धावपळ उडाली. पाणी गळती थांबवण्यासाठी व छताचे क्लॅडिंग निसटू नयेत, यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्यात आली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 28/May/2025