सावर्डे : संगमेश्वर तालुक्याच्या उत्तरेकडील आरवली परिसरात बीएसएनएलची मोबाईल सेवा सप्ताहात दर शनिवार व रविवारी खंडित होत आहे. अखंड सेवा मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. याबाबत कंपनीचे वरिष्ठ अधिकारीही थातूरमातूर उत्तरे देऊन ग्राहकांची बोळवण करत आहेत.
येथील महामार्गालगत विचारे निवासस्थानाच्या शेजारी कंपनीचा मनोरा आहे. केंद्र शासनाच्या कक्षेतील ही कंपनी असल्याने तिचे मोबाईल भाडे ग्राहकांना परवडेल, अशा दरात आहे. त्यामुळे परिसरातील शेकडो ग्राहकांनी व शेतकऱ्यांनी कंपनीची सीमकार्ड घेतली आहेत; मात्र कंपनी सप्ताहात शनिवार व रविवार असे दोन दिवस सेवा खंडित करत आहेत. कंपनी महिन्याचा रिचार्ज
भरून घेत आहेत; मात्र सेवा वीस दिवसच मिळत आहे. ग्राहकांची कंपनी छुप्या मार्गाने लूट करत असल्याची भावना मंगेश परकर या ग्राहकाने व्यक्त केली आहे. खंडित सेवेबद्दल संगमेश्वर येथील कंपनीच्या कार्यालयात चौकशी केली असता दुरुस्ती सुरू आहे, असे सांगून ग्राहकांची बोळवण केली जात आहे.
यासंदर्भात कनिष्ठ अभियंता उमेश शिरसाठ यांनी सांगितले. आरवली येथील मनोऱ्याच्या यंत्रणेमध्ये बिघाड झाला आहे. दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य रत्नागिरीमधून मागवण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात मनोऱ्यातील दोष दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. या मनोऱ्यावर मोबाईलची ४-जी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यानंतर ग्राहकांना अखंड सेवा मिळेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 28/May/2025














