लांजा : लांजा शहरातील श्रीराम मंदिरनजीक पुलाचे काम अर्धवट असल्यानेच पुलाखालून जाणाऱ्या नदीचे पाणी आजुबाजूच्या घरात शिरू लागले आहे. पावसाचा जोर वाढला तर लांजात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे लांजा शहरातील कामे पावसाळ्यापूर्वीच शहरातील कामे पूर्ण होतील, असे संबंधित अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले होते; मात्र पावसाचा मोठा फटका शहरातील कामांना बसला आहे. लांजा शहरातील उड्डाणपूल, दुतर्फा गटार यांची कामे चालू असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. खड्डे आणि चिखलातून वाट काढत जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. पादचारी या रस्त्यावरून चालण्यास धजत नसल्याचे दिसून येत आहे.
पुलाचे काम अर्धवट, गटाराची कामे अर्धवट स्थितीत, सेवारस्त्याचा पत्ता नाही. शहराची दयनीय अवस्था झाली आहे तसेच शहरातील दोन महत्वाचे पुलाची कामेही अर्धवट आहेत. पुलाचे काम पूर्ण झाले नाही तर पावसाच्या पाण्याचा तडाखा शहरातील परिसरातील वस्तीला बसण्याची दाट शक्यता आहे.
महामार्ग बंद पडण्याची भीती असल्याचे बोलले जात आहे. गेल्या आठवडाभर पाऊस कोसळत असल्याने नदीनाले दुथडी भरून वाहात आहेत. शहरातील श्रीराम मंदिरनजीकच्या पुलाचे काम अर्धवट आहे. पुलाखालून जाणाऱ्या नदीच्या पाण्याचा निचरा पूर्णपणे होत नसल्याने पाणी तुंबून परिसरातील घराच्या दिशेने शिरू लागले आहे. पाऊस थांबला नाही आणि पाण्याचा निचरा झाला नाही तर पूरपरिस्थिती होण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 28/May/2025














