खेड : तरुणीचे बनावट इन्स्टाग्राम खाते काढून ब्लॅकमेल करणाऱ्याला तरुणाला अटक

खेड : तरुणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून तिच्या होणाऱ्या पतीला अश्लील फोटो आणि मेसेज पाठवून तिची बदनामी करणाऱ्या तरुणाला खेड पोलिसांनी अटक केली आहे. तेजस सदानंद पवार (३०, रा. अनारी-गणेशवाडी, चिपळूण) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीत जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही म्हटले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातील पीडित तरुणीसोबत असलेल्या पूर्वीच्या संबंधांचा गैरफायदा घेत संशयित तेजस पवार याने तिच्या नावाने एक बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले. या खात्यावरून त्याने तरुणीला अश्लील भाषेत मेसेज पाठवले. ‘आपण रिलेशनमध्ये असतानाचे तुझे फोटो व्हायरल करीन, तुला काय करायचे ते कर,’ अशी धमकी देत त्याने जातीवाचक शिवीगाळही केली. इतक्यावरच न थांबता त्याने हे अश्लील फोटो आणि बदनामीकारक मेसेज पीडितेच्या होणाऱ्या पतीच्या मोबाईलवर पाठवून तिची बदनामी केली. हा प्रकार एप्रिल २०२४ ते २५ मे २०२५ या कालावधीत घडला.

अखेरीस होणारा त्रास असह्य झाल्याने पीडित तरुणीने रविवारी सायंकाळी खेड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रात्री उशिरा संशयित तेजस पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि सोमवारी सायंकाळी त्याला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी भागुजी औटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भोयर करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 28/May/2025