रत्नागिरी : विजयादशमीच्या पूर्वसंध्येला काल रत्नागिरीतील कोकण नगर येथून निघालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनादरम्यान मुस्लिम समाजातील काहिजण एकत्र येऊन त्यांनी पोलिसांसमोरच अल्लाहू अकबर च्या घोषणा दिल्या. यामुळे भावना दुखावलेला हिंदू समाज शहर पोलीस स्थानकात रात्री जमा झाला. या जमलेल्या जमावाची समजूत काढण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला. शेवटी रात्री उशिरा सबंधितांवर गुन्हा दखल केल्याची माहिती मिळत आहे.
विजयादशमीच्या पूर्वसंधेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने येथील कोकण नगर परिसरातून संचलन काढण्यात आले. दरवर्षी शहराच्या वेगवेगळ्या भागातून हे संचालन काढण्यात येते. याची रीतसर पोलीस परवानी देखील घेण्यात येते. यावर्षी कोकण नगर परिसरातून निघणाऱ्या संचलनासाठी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. मात्र संचलना सुरू होताच या ठिकाणी मुस्लिम समाजातील काहीजणांनी एकत्र येत संचलन रोकण्याचा प्रयत्न केला. याचवेळी जमलेल्या जमावाने अल्ला हा अकबर च्या घोषणा दिल्या. हा हा म्हणताच संपूर्ण शहरात हे वृत्त पसरले आणि मोठ्या संखेने हिंदू समाजातील लोकांनी पोलीस स्थानकात धाव घेत सबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
ही घटना घडताच राष्ट्रीय स्वंसेवक संघाचे स्वयंसेवक तसेच काही समविचारी संघटनांचे कार्यकर्ते देखील पोलीस स्थानकात जमा झाले होते. रात्री सुमारे ३ वाजेपर्यंत हा जमाव मोठ्या संखेने पोलीस स्थानकात ठाण मांडून बसला होता. भाजप नेते बाळ माने, एड. दीपक पटवर्धन, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत हे देखील पोलीस स्थानकात आले. यांनी संघाच्या संचलनात वाट अडवली त्यांना तत्काळ अटक करा अशी मागणी करण्यात आली. रात्री उशिराने या प्रकरणी गुन्हा दखल करण्यात आल्यावर जमाव मागे फिरला.
कोकण नगर परिसरात कडेकोट बंदोबस्त
काल रात्री घडलेल्या घटनेला अनुसरून पोलिसांनी आज कोकणनगर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर हे जातीनीशी काल रात्रीपासून पोलीस स्थानकात उपस्थित होते. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात कशी राहिल यासाठी ते प्रयत्न करीत होते. आज कोकण नगर येथे याच अनुषंगाने मोठा पोलीसफाटा तैनात केला आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच दोन्ही समजाना शांततेचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.













