गुहागर : मुसळधार पावसाचा तडाखा गुहागर तालुक्याला बसला असून घरे, बांध आणि उत्पन्न देणारी झाडे कोसळून मोठे नुकसान झाले आहे. अंजनवेल बौद्धवाडी येथे रस्त्याच्या बाजूच्या दरडीवरील दगड कोसळल्याने बौद्धवाडीतील घरातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत. आबलोली व भातगाव येथे रस्त्यावर कोसळलेल्या दरडी जेसीबीच्या साह्याने बाजूला केल्या जात आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच धोपावे येथे मुख्य वीजवाहिनीवर झाड पडल्यामुळे दोन गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. तो सुरळीत करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना भरपावसात कसरत करावी लागत आहे.
गुहागर तालुक्यात गेले आठवडाभर जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अडूर येथील अशोक नाना देवले यांच्या अंगणातील आंब्याचे जुने झाड कोसळले, वेलदर नवानगर येथील यशवंत जांभारकर यांच्या शौचालयावर दगड व माती आल्याने शौचालयाचे नुकसान झाले, धोपावेत मुख्य वाहिनीवर झाड पडून धोपावे आणि त्रिशूरुसाखरी गावाचा वीजपुरवठा बंद झाला होता; परंतु काहीवेळाने झाड बाजूला केल्यानंतर पुरवठा सुरळीत करण्यात आला, कोठळूक फिरवलेवाडी येथील गंगाय पांडुरंग भेकरे यांच्या घराची पहली छप्पर कोसळले. पालशेत-हेदवी रस्त्यावर पालशेत पाटा वरचीवाडी येथे जंगली झाडांची फांदी पडून रस्ता बंद झाला. तो पुन्हा सुरळीत करण्यात आला आहे. असगोली खारवीवाडी येथील गायत्री रमेश पालशेतकर यांच्या पराची संरक्षण भिंत कोसळली आहे.
वडद येथील संजय शशिशेखर सोमण यांच्या घराचे छप्पर कोसळले. कौढर काळसूर येथे सुकाडवाडी येथील सार्वजनिक विहिरीचे बांधकाम पडले आहे. त्यामध्ये १५ हजारांचे नुकसान झाले, मोहितेवाडीतील प्रभावती गोपाळ मोहिते यांच्या घरावर आंब्याच्या झाडाची फांदी पडली. आरे बौद्धवाडी वेधील साकव पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. भातगाव तिसंग येथील पार्वती शंकर वेले यांच्या घराशेजारील बांध कोसळला आहे. अंजनवेल बौद्धवाडी येथे रस्त्याच्या बाजूच्या दरडीवरील दगड कोसळल्याने बौद्धवाडीतील घरातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत. गुहागर परचुरी बौद्धवाडीतील विहिरींची संरक्षण भिंत पहून २५ हजारांचे, वरवेली येशील नामदेव रत्नू रावणग यांचे गोठ्याचे नुकसान झाले. भालगाव येथील विजय महादेव मुंडेकर यांच्या बंद घरावर झाड पडले, भातगाव बौद्धविहाराची संरक्षक भिंत कोसळली, तवसाळ बाबरवाडी येथील सुरेश गोविंद येद्रे यांच्या घरावर झाडाची फांदी पडली. वड़द येथील फिडर नादुरुस्त झाल्याने तीन दिवस गाव अंधारात आहे. आरे येथील गुहागर बेलपुर पुलाला लागून मोठमोठी लाकडे अडकली आहेत, ती मोकळी करणे आवश्यक आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
तीन वाड्यांचा पाणीपुरवठा बंद
उमराठ कोंडवीवाडी, डागवाडी आणि धनावडेवाडी येथे गेले दोन दिवस वीज नसल्यामुळे पाणीपुरवठा बंद झालेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली होती. याबाबत उमराठ सरपंच जनार्दन आंबेकर यांनी वीजपुरवठा सुरळीत करतानाच पाणीपुरवठा करा, अशी मागणी केली आहे.
गटारे बुजल्याने माती रस्त्यावर
मोडकाआगर ते रोहिले या भागात केबल टाकण्यासाठी खोदलेले चर बुजवून झाल्यावर तिथे कुठेही रोलिंग करण्यात आलेले नाही, तसेच गटारसुद्धा मोकळे केलेले नाही. याची सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले तसेच नरवण येथील रस्त्याच्या उताराला गटारे बुजल्यामुळे आणि केबलच्या पाईपवरील माती रोलिंग न केल्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर दगड, माती रस्त्यावर आली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे तसेच संबंधित कंत्राटदाराकडून कामाची पूर्तता करून घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 28/May/2025














