◼️ उन्हानंतर आता वारा-पावसाच्या माऱ्यात तिष्ठत राहण्याची वेळ..
रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्गाचे सुरू असलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी जोरदार आटापिटा सुरू आहे; मात्र यंदा पावसाचे १२ दिवस अगोदरच आगमन झाले, त्यामुळे महामार्गाच्या अर्धवट कामामुळे येथील वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. महामार्ग उभारणीसाठी पूर्वीच्या अस्तित्वातील रस्त्यावरील प्रवासी निवाराशेड तोडण्यात आल्या होत्या; परंतु पावसाळ्यापूर्वी नव्याने पर्यायी निवाराशेड उभारल्या गेल्या नसल्याने प्रवाशांवर आता भरपावसात बसची वाट पाहात तिष्ठत उभे राहण्याची वेळ आली आहे. यामुळे प्रवासीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महामार्गाच्या या रेंगाळलेल्या कामामुळे प्रवाशांना या अगोदर उन्हाळ्यात धुळीचा सामना करावा लागत होता. प्रवाशांनी उन्हाचा मारा सहन केला; मात्र आता पाऊसही झेलण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शहरालगतच्या साळवीस्टॉप ते हातखंबा या सुमारे १२ किलोमीटर अंतरावर जे. के. फाईल्स, टीआरपी, रेल्वेस्टेशन, गयाळवाडी, कारवांचीवाडी महालक्ष्मी स्टॉप, खेडशी, पानवल, हातखंबा, कापडगाव येथील रस्ता दुतर्फा निवाराशेडचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे प्रवासीवर्गाची मोठी गैरसोय होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना भरपावसात ताटकळत उभे राहावे लागत आहे. महामार्गाच्या अर्धवट कामाचा अनेकांना फटका बसला आहे.
रत्नागिरीतून जाणाऱ्या या महामार्गाचे चार किमीचे काम प्रलंबित आहे. कामाची स्थिती ठिकठिकाणच्या टप्प्यानंतर रेंगाळल्याचे दिसत आहे. काम अपेक्षित वेगाने पूर्णत्वास जात नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. उन्हाळ्यात प्रवाशांना रस्त्याच्या मध्येच उभे राहून वाहनांची प्रतीक्षा करावी लागलो. पावसाळ्यातही या परिस्थितीत बदल झालेला नाही. ऊन-पाऊस, वाऱ्याचा मारा सहन करत रस्त्याकडेला उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. तेथे तात्पुरत्या निवाराशेड उभारण्याचे आश्वासन कंपनीमार्फत देण्यात आले असले तरी त्याबाबत कोणतीही व्यवस्था केलेली दिसून येत नाही. या विषयी सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्रवाशांचे हाल थांबणार कधी ?
१९ मेपासून मॉन्सूनपूर्व पावसाने जोर धरला. यात महामार्गाचेही मोठे नुकसान झाले आहे. शहरानजीकच्या चंपक मैदान, परटवणेकडे जाणाऱ्या माहामार्गाच्या मोरीचा भराव मोठ्या प्रमाणात खचला आहे. मॉन्सूनचेही आगमन यंदा लवकर झाल्याने निवारा शेड अभावी होणारे प्रवासीवर्गाचे हाल थांबणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:53 PM 28/May/2025














