पावस : ऐन नवरात्रोत्सवात सलग तिसऱ्या दिवशी रत्नागिरी तालुक्यासह पावस परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. दिवसभर रिपरिप सुरू राहिल्यामुळे भातकापणी रखडली असून, अनेक ठिकाणची भातरोपं आडवी झालो आहेत. हवामान विभागाने १४ ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहील, असा अंदाज वर्तवल्यामुळे बळीराजा धास्तावलेला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात काल सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासात सरासरी २.७० मिमी पाऊस झाला. त्यात दापोली ०.१४, चिपळूण ०.४४, संगमेश्वर ०.५०, रत्नागिरी ४.११. लांजा ७. राजापूर १२.१२ मिमी पाऊस झाला. मागील दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्रच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. दुपारपर्यंत ऊन पडलेले होते. त्यानंतर अचानक आभाळ भरून आले आणि वेगवान वाऱ्यासह पावसाने सुरवात केली. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. या पावसामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. रत्नागिरीसह पावस बाजारात झेंडू विक्रीसाठी बसलेल्या व्यावसायिकांना फुले झाकून ठेवण्याची कसरत करावी लागली. काहींची फुले भिजून वाया गेली.
यंदा पोषक वातावरण असल्यामुळे भातशेती चांगल्याप्रकारे होईल, असा अंदाज होता; मात्र नवरात्रोत्सवात पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी भयभीत झाला आहे. पुढील बार- पाच दिवसात कडक ऊन पडले तर भातकापणीच्या कामाला वेग येईल अन्यथा पडणाऱ्या पावसामुळे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हळवी बियाणे तयार झाली असून, पावसामुळे ती पडली आहेत. त्यात पाणी साचल्यामुळे कोंब येऊ लागले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 12/Oct/2024














