रत्नागिरी, २८ मे २०२५ : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराध्यक्ष श्री. परशुराम (दादा) ढेकणे यांच्या पुढाकाराने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित निबंध स्पर्धा आणि दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा काल मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष श्री. राजेशजी सावंत साहेब, कोकण पदवीधर विधान परिषद आमदार श्री. निरंजन डावखरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षाताई ढेकणे आणि पदवीधर आघाडी संयोजक श्री. मनोज पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्यात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या एकूण ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. शिर्के प्रशालेचे शिक्षक श्री. राजेश आयरे यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनाबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच, पुढील शैक्षणिक वाटचाल कशी असावी याबद्दलही त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, जे विद्यार्थ्यांना भविष्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निलेश आखाडे यांनी अतिशय प्रभावीपणे केले. या प्रसंगी भाजपच्या महिला शहराध्यक्ष सौ. पल्लवीताई पाटील, सौ. संगीताताई कवितके, सौ. सायलीताई बेर्डे, तसेच श्री. संदीप (बाबू) सुर्वे, श्री. नितीन जाधव, श्री. सचिन गांधी, श्री. मंदार खंडकर आणि श्री. शैलेश बेर्डे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळालेच, शिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यास मदत झाली. भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबवण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सामाजिक जाणीव वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 28-05-2025














