राजापूर : मिठगवाणेत घरावर झाड पडून नुकसान

राजापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यामध्ये सुरू असलेली मॉन्सूनपूर्व पावसाची रिपरिप आजही सुरू होती. सकाळच्या सत्रामध्ये मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने दुपारनंतर मात्र, विश्रांती घेतली होती. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडण्याची थोडी उसंत मिळाली होती. वादळी वाऱ्यामध्ये मिठगवाणे येथील संतोष लिंगायत यांच्या घरावर आंबा कलमाचे झाड पडून घराचे नुकसान झाले आहे. तर, कोंड्ये आणि सागवे येथील फिडर फॉल्टी झाल्याने त्या परिसरातील गावे आणि सोल्ये, बाकाळे येथे विजेचे खांब पडल्याने त्या गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता.

गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यामध्ये मॉन्सूनपूर्व पावसाचा जोर असून, अर्जुना कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली असली तरी, इशारा पातळी अद्यापही ओलांडलेली नाही. तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टी भागामध्ये पावसासोबत वादळीवारेही घोंगावत असल्याने मच्छीमार बांधवांनी मासेमारीसाठी समुद्रात जाण्याऐवजी घरी राहणेत पसंत केल्याचे चित्र दिसत आहे. मिठगवाणे येथे संतोष लिंगायत यांच्या घरावर आंबा कलमाचे झाड कोसळून नुकसान झाले.

दरम्यान, गेल्या चोवीस तासांमध्ये तालुक्यामध्ये ७३.३७ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, मॉन्सूनपूर्व पावसाचा वीजवितरपण विभागाला चांगलाच तडाखा बसला आहे. त्यामध्ये अनेक गावांमधील विजेची बत्ती गुल झालेली आहे. कोंड्ये फिडर फॉल्टी असल्यामुळे प्रिंदावण, उपळे, तारळ, पन्हळे आणि परिसरातील तर, सागवे येथील फिडर फॉल्टी असल्यामुळे सागवे, शिस्से, कुंभवडे, नाणार, बुरंबे आदी गावांमधील वीजपुरवठा काल सकाळपासून खंडित झालेला होता. तर, सोल्ये येथे दोन, तर बाकाळे येथे विजेचा खांब कोसळल्याने त्या गावंमधील दिवसभर वीजपुरवठा खंडित झालेला होता. खंडित झालेला वीजपुरवठा कार्यान्वित करण्याच्यादृष्टीने महावितरण विभागाचे जोरदार प्रयत्न सुरू होते.

प्रशासकीय यंत्रणे सतर्क
पावसामुळे होणारे नुकसान, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रशासनाची विविध पथके घटनास्थळी धाव घेऊन आवश्यकत्या उपयायोजना करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 28/May/2025